गयाना : भारताने वेस्ट इंडीजचे 160 धावांचे आव्हान तीन विकेट्सच्या मोबदल्यात पार करत मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवले. मोक्याच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने 44 चेंडूत 83 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला तिलक वर्माने 49 धावांची नाबाद खेळी करत चांगली साथ दिली.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या विंडीजने भारतासमोर विजयासाठी 160 धावांचे आव्हान ठेवले. वेस्ट इंडीजकडून सलामीवीर ब्रँडन किंगने 42 तर कर्णधार रोव्हमन पॉवेलने फटकेबाजी करत विंडीजला 150 पार पोहचवले. भारताकडून फिरकीपटू कुलदीप यादवने 4 षटकात 28 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. रोव्हमन पॉवेलने 19 चेंडूत 40 धावा करत वेस्ट इंडीजला 5 बाद 159 धावांपर्यंत पोहचवले.
भारताचा टी 20 कर्णधार हार्दिक पांड्या वेस्ट इंडीज विरूद्धच्या मालिकेत सलग तिसऱ्या पराभवाच्या उंबरठ्यावर उभा होता. मात्र मुंबई इंडियन्सची जोडी सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी मिळून हार्दिक पांड्याचं नाक कापण्यापासून वाचवलं.
भारताने तिसऱ्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडीजने ठेवलेले 160 धावांचे आव्हान 18 व्या षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. वनडे मालिका आणि पहिल्या दोन टी 20 सामन्यात फेल गेल्यानंतर अखेर सूर्यकुमार यादवने आपल्या भात्यातून एकापेक्षा एक भारी फटके काढत 44 चेंडूत 83 धावांची धडाकेबाज खेळी केली.





