फ्रिस्को (टेक्सास) : अर्जेंटिनाच्या विश्वविजेतेपदात मोलाची भूमिका बजावणारा लियोनेल मेस्सी अमेरिकेतील इंटर मियामी या फुटबॉल क्लबमधूनही अव्वल दर्जाचा खेळ करीत आहे. त्याने इंटर मियामीचे अवघ्या चार सामन्यांत प्रतिनिधित्व करताना सात गोल करीत आपली चमक दाखवली आहे.
या मोसमात त्या क्लबकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडूही तो ठरला आहे. इंटर मियामीने रविवारी झालेल्या लढतीत एफसी डल्लास क्लबवर ४-४ अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-३ असा विजय संपादन केला आणि लीग फुटबॉल करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
लियोनेल मेस्सीने इंटर मियामी संघासाठी पहिला सामना खेळताना फ्री किकवर दमदार गोल केला. त्यानंतरच्या पुढील दोन सामन्यांमध्ये त्याने प्रत्येकी दोन गोल केले. अटलांटा युनायटेड व ओरलँडो सिटी या क्लबविरुद्ध त्याने शानदार कामगिरी केली. त्यानंतर रविवारी त्याने पुन्हा एकदा आपली धमक दाखवली. मेस्सीने सहाव्या व ८५ व्या मिनिटाला गोल करीत इंटर मियामी संघाला एफसी डल्लास संघाशी ४-४ अशी बरोबरी साधून देण्यास मोलाचे सहकार्य केले.
इंटर मियामी संघाकडून बेंजामिन क्रेमासची याने ६५ व्या मिनिटाला गोल केला. तसेच एफसी डल्लासच्या मार्को फारफॅन याने ८० व्या मिनिटाला स्वयंगोल केल्यामुळे इंटर मियामी संघाला बरोबरी साधता आली. एफसी डल्लास संघाकडून फाकुंडो क्विगनॉन, बर्नाड कामुंगो, एलन वेलास्को यांनी गोल केले. इंटर मियामी संघाच्या रॉबर्ट टेलर याने स्वयंगोल केला. त्यामुळे एफसी डल्लासही चौथा गोल झाला.
पेनल्टी शूटआऊटची रंगत
निर्धारित वेळेत ४-४ अशी बरोबरी झाल्यानंतर दोन्ही क्लब्समध्ये पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. इंटर मियामी संघाकडून लियोनेल मेस्सी, सर्जियो बुसकेट, लियोनार्डो रोमेरो, कमल मिलर व बेंजामिन क्रेमासची यांनी गोल करीत विजय निश्चित केला. एफसी डल्लास संघाकडून पॉल ॲरीयोला, फाकुंडो क्विगनॉन व जेसस फेरेरा यांनी गोल केले. पॅक्सटन पोमिकाल याला गोल करता आला नाही.
मेस्सीच्या आगमनाने कायापालट
इंटर मियामी क्लबने लियोनेल मेस्सीशी करार केला. मेस्सी संघासोबत जोडण्याआधी इंटर मियामी संघ ११ सामन्यांमध्ये विजयापासून दूर राहिला होता, पण मेस्सीचा संघात प्रवेश झाल्यानंतर इंटर मियामी संघाच्या कामगिरीत सुधारणा झाली. आता हा संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.





