नवी दिल्ली- उत्तर प्रदेशात अयोध्या राम मंदिराचे निर्माण कार्य गतीने सुरु आहे. तळातील राम मंदिर परिसर पूर्ण होत आलाय. 2024 च्या 15 ते 24 जानेवारीदरम्यान मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होण्याची शक्यता आहे. त्याआधी रामभूमीसाठी देशभरातील लोकांकडून मंदिरासाठी विविध वस्तू दान म्हणून दिल्या जात आहेत. अलीगडच्या एका वयस्कर व्यक्तीने अयोध्येच्या राम मंदिरासाठी 400 किलोचे कुलूप तयार केले आहे. रामाचे भक्त असलेले सत्य प्रकाश शर्मा यांनी हे कुलूप तयार केलंय.
सत्य प्रकाश शर्मा हाताने बनवलेल्या कुलुपांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी जगातील सर्वात मोठे कुलूप तयार करण्यासाठी महिनोंमहिने प्रयत्न केले आहेत. त्यांनी बनवलेले कुलूप 10 फूट उंच, 4.5 फूट लांब आणि 9.5 इंच मोठे आहे. त्याची चावी 4 फूट लांब आहे. माहितीनुसार, सत्य प्रकाश शर्मा यांनी आपल्या आयुष्याची कमाई हे कुलूप बनवण्यासाठी वापरली आहे. हे कुलूप बनवण्यासाठी त्यांना जवळपास 2 लाख रुपये लागले आहेत. मी गेल्या अनेक वर्षांपासून कुलूप बनवण्याचं काम करत आहे. त्यामुळे मी एक भव्य असे कुलूप बनवण्याचा विचार करत होतो. याआधी कोणीही असं काम केलेलं नाही. हे माझ्यासाठी ‘प्रेमाची मेहनत’ आहे. माझ्या पत्नीनेही मला या कामात मदत केली आहे.
या वर्षाच्या शेवटपर्यंत हे कुलूप मंदिर प्रशासनाला देण्याचा माझा विचार आहे, असं सत्य प्रकाश शर्मा म्हणाले. विशेष म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला कुलूप अलिगड येथील वार्षिक प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलं होतं.२०२० साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मंदिराच्या जागेचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. आता हे मंदिर आकार घेतंय. पाच वर्षांच्या बालकाच्या रुपातील श्रीरामांची मूर्ती मंदिरात स्थापन करण्यात येणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत फिनिशिंग टच देण्यात येईल. तळ भागात भगवान श्रीरामांचं संपूर्ण कुटुंब असणार आहे. तर, दुसऱ्या मजल्यावर कोणतीही मूर्ती नसणार आहे, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली.





