शरद पवारांना मोठा धक्का ; ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर..? शाहांसोबत झाली गुप्त भेट!

110

पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी बंड झालं. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला, तर काही नेत्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला. यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी चर्चेत आली आहे.

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुप्तभेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ही भेट झाल्याची माहिती आहे.

त्यामुळे जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. राष्ट्रवादीचे अनेक आमदार तसेच कार्यकर्त्यांनी अजित पवारांना समर्थन दिलं. दुसरीकडे शरद पवार यांनी मात्र आपलं या बंडाला समर्थन नसल्याचं जाहीर केलं. ज्यांना जायचं आहे त्यांनी निघून जावं, मी राष्ट्रवादी पक्ष नव्याने उभारणार, असं म्हणत शरद पवारांनी बैठक देखील घेतली. दरम्यान, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांनी पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता.

अशातच शरद पवार यांचे विश्वासू जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामागचं कारणंही तसंच आहे. जयंत पाटील यांनी पुणे दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती आहे. याबाबतची माहिती ‘साम टिव्ही’ने खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. अमित शहा यांच्या भेटीनंतर आता जयंत पाटील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

या चर्चांवर उदय सामंत यांची प्रतिक्रिया

या चर्चांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सामंत बोलताना म्हणाले, ‘जयंत पाटील आमच्याकडे येणार की नाही माहिती नाही. मागच्या काही दिवसात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कामाने प्रभावित होऊन कदाचित त्यांचा विचार बदलला असेल तर माहिती नाही.’