नितीन देसाई यांचा मृत्यू कशामुळे झाला? ; पोस्टमार्टमचा अहवाल आला समोर!

212

मुंबई : नितीन चंद्रकांत देसाई यांच्या निधनानं बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी त्यांच्या स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींना उधाण आले आहे. कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये बुधवारी दुपारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या मृत्यूबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी नितीन देसाई यांचा मृतदेह काल ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे रुग्णालयात पाठवला होता. तिथे ४ डॉक्टरांच्या पथकांने त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले आहे. नितीन देसाई यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे.

नितीन देसाई यांचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाला, अशी प्राथामिक माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर नितीन देसाई यांचं पार्थिव पुन्हा एन. डी. स्टुडिओत नेलं जाणार असून तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक अडचणी वाढल्यामुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचललं असल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी नितीन देसाई यांचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. मोबाईलमधील काही ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. पोलीस याबाबतचा अधिक तपास सुरू आहे.