- सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात आज रात्री ८ वाजून ५१ मिनीटाच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
सह्याद्री पट्ट्यातील सांगेलीसह माडखोल, कलंबिस्त, सरमळे, ओटवणे, कारिवडे, कोनशी, भालावल, ओवळीये, धवडकी, विलवडे आदी गावांमध्ये मोठा आवाज होऊन सौम्य धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मोठा आवाज होऊन जमीन हादरली. त्यामुळे तो भूकंपाचा सौम्य धक्का असावा, असा दावा सांगेली सरपंच लवू भिंगारे यांनी केला आहे.
दरम्यान याबाबत तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता हा भूकंपाचाच प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. हा ३ रिस्टर स्केलचा हा भूकंप होता. मात्र, त्याचा केंद्रबिंदू नेमका कुठे आहे? ते निश्चित झाले नसल्याची माहिती त्यांनी सांगितली.
दरम्यान साधारण तीन वर्षांपूर्वी असाच काहीसा धक्का सावंतवाडी शहरासह या परिसरात बसला होता. यावेळी माडखोल सह दाणोली, सातोळी, बावळट, अगदी बांद्यापर्यंत जमीन हादरल्याचे अनेकांकडून सांगण्यात आले होते. असाच काहीसा प्रकार आज पुन्हा झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, हा भूकंप असल्याचे अधिकृत रित्या प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.





