राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी | परळी न्यायालयात हजर राहणार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. परळीतील एका प्रकरणात न्यायालयाने राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज ( १८ जानेवारी ) परळी न्यायालयात हजर राहणार आहेत. सकाळी ११ वाजता राज ठाकरे परळी न्यायालयात हजर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

२००८ साली ऑक्टोंबर महिन्यात राज ठाकरेंना मुंबईत अटक करण्यात आली होती. त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. ठिकठिकाणी तोडफोडीचे प्रकारही घडले. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर एसटीवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. या घटनेनंतर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि चिथावणीखोर वक्तव्य प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते.