राजापुरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत!

48

राजापूर : गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि तालुक्यात कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नदयांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तालुक्यात पडझडीच्या घटना घडल्या आहेत. राजापूर तालुक्यात बुधवार अखेर सरासरी 1236.12 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर कोदवली नदीला आलेल्या पुरामुळे राजापूर शहर बाजारपेठेत पुराचे पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली असून व्यापारी आणि नागरिक सतर्क झाले आहेत. वादळी वाऱ्यासह मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात अनेक ठीकाणी वीजपुरवठा खंडीत झाला आहे.

कोदवली व अजुर्ना नद्यांनी इशारा पाततळी ओलांडली असल्याने प्रशासनाकडून नदीकिनाऱ्यालगतच्या नागरीक व व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर वरचीपेठ शिळ, गोठणे, दोनिवडे रस्ता पाण्याखाली गेला आहे. तर ग्रामीण भागात काही रस्त्यांवर पाणी आले आले आहे. अर्जुना नदीतील पुंडलिक मंदिर परिसरही पाण्याखाली गेला आहे.

मंगळवार पासून राजापूर तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. ठिकठिकाणी नदी नाले भरून वाहत असून शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नदया दुथडी भरून वाहू लागल्या असून पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. कोदवली नदीच्या पात्र भरून वाहून लागल्याने जवाहरचौक परिसरात पाणी शिरू लागले आहे. तर दोन दिवसांपासून होणाऱ्या संततधार पावसामुळे तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे भातलावणीच्या कामात व्यत्यय निर्माण झाला आहे. तर वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील कोतापूर येथील शेतकरी नारायण धनाजी जानस्कर यांचा गुरांचा गोठा कोसळला आहे. तर मिठगवाणे कुळंबौशीवाडी येथील काजूचे झाड कोसळून सार्वजनिक मांडव आणी लाईट पोलचे नुकसान झाले आहे. याबाबत महसुल प्रशासन स्तरावर पंचनामे करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

राजापूर तालुक्यात दोन दिवसांत संततधार पाऊस पडत असून या हंगामातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. आज बुधवार अखेर एकूण पाऊस 9889मिमी तर सरासरी 1236.12 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अर्जुना आणि कोदवली नदयाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने राजापूर शहर बाजारपेठेत पुराचे पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्याने जवाहरचौकाकडे आगेकुच सुरू केली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील नागरिक व व्यापारी सतर्क झाले आहेत. वादळी वाऱ्यासह मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात अनेक ठीकाणी विजपुरवठा खंडीत झाला आहे. भर पावसातही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

पावसाचा जोर वाढल्याने प्रशासनाने सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. राजापूर शहर व तालुका परिसरातील सर्व शासकिय अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालय सोडू नये असे आदेश प्रांताधिकारी वैशाली माने यांनी दिले आहेत. प्रांताधिकारी वैशाली माने व तहसीलदार सौ. शीतल जाधव यांनी आज राजापूर शहर व तालुक्यातील पुर परिस्थितीचा आढावा घेत पहाणी केली.