विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आपल्या आयुष्याचा पाया मजबूत करावा – तहसीलदार श्रीधर पाटील

76

सावंतवाडी – मळेवाड येथे सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायत मळेवाड कोंडुळे कडूनगावातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.श्री कुलदेवता विद्यामंदिर मळेवाड शाळा नंबर 2 मधील वह्या वाटप कार्यक्रम हा सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते वह्या वाटप करून संपन्न झाला.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना पाटील यांनी आपण विद्यार्थी दशेत असताना कशा प्रकारे संघर्ष करून या पदापर्यंत पोहोचण्यासाठी घेतलेली मेहनत सांगत असताना विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करून आपल्या आयुष्याचा पाया मजबूत करावा असे आवाहन केले.तसेच पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याकडून प्रत्येकी एक झाड देणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.आपण व आपले कुटुंबीय विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करत असून श्री कुलदेवता विद्यामंदिर मळेवाड शाळा नंबर 2 मधील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक पुस्तक आपण भेट म्हणून देणार असल्याचेही आश्वासन पाटील यांनी दिले.

या वह्या वाटप कार्यक्रमावेळी उपसरपंच हेमंत मराठे यांनी गावातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे व आरोग्याच्या दृष्टीने सुख सोयी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ग्रामपंचायत करत असलेल्या कार्याचा आढावा तहसीलदार श्रीधर पाटील यांच्यासमोर विशद केला.

या कार्यक्रमावेळी सरपंच मिलन पार्सेकर,तंटामुक्ती अध्यक्ष अमित नाईक,ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव,ग्रामपंचायत सदस्य सानिका शेवडे,ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मुळीक,केंद्रप्रमुख म ल देसाई,मुख्याध्यापक लवू सातार्डेकर,आजगाव मंडल अधिकारी कोदे,तलाठी नागराज,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तात्या मुळीक,बाळू मुळीक आदी उपस्थित होते.