भर पावसात कणकवलीत उड्डाणपुलाला कलर करण्याचे काम सुरू.!
राजकीय लोकप्रतिनिधी गप्प का ? पालकमंत्र्यांचे ते केवळ आश्वासनच
कणकवली | मयुर ठाकूर : तालुक्यातील मुंबई – गोवा हायवेच्या उड्डाणपुलावरून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित होत असल्याचे चित्र काही दिवसांपूर्वी प्रसारित करण्यात आले होते. त्याची दखल घेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कणकवली येथील शासकीय विश्राम गृहात पत्रकारांशी संवाद साधताना हे जे ओव्हरब्रिज वरून धबधबे वाहत आहेत ते येत्या आठ दिवसांत बंद होतील त्याच काम दोन दिवसांत सुरू होईल असे आश्वासन दिले होते. मात्र आताची वस्तुस्थिती जर पाहिली तर हायवेप्राधिकरण आणि ठेकेदार यांचा भोंगाळ कारभार सुरू असल्याचे चित्र आहे.

लोकप्रतिनिधी व स्थानिक लोकप्रतिनिधी हे फक्त निव्वळ घोषणा करून प्रसिद्धी मिळवून मोकळे होतात. परंतु जी आक्रमकता गड नदी पुलाच्या बाबतीत दिसून आली होती ती आक्रमकता संपली की काय.? असा प्रश्न जनसामान्य माणसातुन उपस्थित केला जात आहे.

भर पावसात उड्डाणपुलाच्या पिलरवरून पाणी वाहत असताना देखील त्यावर कलर चे काम सुरू आहे . भर दिवसा हे काम सुरू असताना देखील कोणत्या ना कोणत्या प्रश्नावरून टीका टिपणी करणारे राजकीय नेते मंडळी या प्रश्नाबाबत गप्प का ? हायवे प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला तर ते एक – दुसऱ्या अधिकाऱ्यांची नाव सांगून मोकळे होतात. मात्र एकंदरीत परिस्थितीला जबाबदार कोण ? हायवे ची अपूर्ण काम पूर्ण होणार केव्हा ? त्याच बरोबर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चांगली अत्याधुनिक साधन सामग्री घेऊन काम पूर्ण करणार असल्याचे आश्वाशीत केले होते मात्र त्याचे काय झाले.? अशाही उलट सुलट चर्चा उड्डाण पुलाच्या या रंगरंगोटीवरून कणकवलीत जोर धरू लागल्या आहेत.





