कळणे खनिज वाहतूकीमुळे वाहनधारकांच्या जिवीतास धोका : चेतन चव्हाण

दोडामार्ग : कळणे येथील खनिज वाहतूक पुन्हा सुरू झाली असून दोडामार्ग ते बांदा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा नाहक त्रास होत आहे, नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. एका बाजूने गॅस पाईप लाईन तर दुसऱ्या बाजूने पाणी पाईप लाईन टाकली असल्यामुळे रस्ता धोकादायक झाला आहे. त्यात आता पुन्हा भर पडली ती म्हणजे कळणे येथील खनिज वाहतूक. डंपर सुसाट वेगाने जात असतात, त्यामुळे नागरिकांच्या तसेच वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

या नियमबाह्य खनिज वाहतूकीमुळे लोकांच्या नाकातोंडात धुळे जात आहे, आरोग्याच्या दृष्टीने ते घातक आहे, तेव्हा प्रशासनाने या खनिज वाहतूकीला आळा घालावा, हे भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे अशी हुकुमशाही सहन केली जाणार नाही. संबधित अधिकाऱ्यांनी स्वतः दुचाकी घेऊन प्रवास करावा आणि नागरिकांना कशा प्रकारे त्रास होतो हे जाणून घ्यावे, अन्यथा वेगळा मार्ग हाती घ्यावा लागेल असा इशारा नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिला आहे.