मुंबई : अजित पवार बंड आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असून अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. यावेळी शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार, खासदार उपस्थित होते.
या सर्वांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावाही अजित पवारांनी शपथविधीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. तसंच सुनिल तटकरे आणि अमोल कोल्हे यांच्या रुपाने दोन खासदारही उपस्थित होते. मात्र याच अमोल कोल्हे यांनी काही तासांतच आपली भूमिका बदलली असून मी शरद पवारांसोबत राहणार असल्याचं आज स्पष्ट केलं आहे. मात्र, आता अजित पवारांना पहिला धक्का बसला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवारांसोबत असल्याचं जाहीर केलं आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी ट्वीट करुन आपली भूमिका जाहीर केली आहे. “जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं।#मी_साहेबांसोबत” असं अमोल कोल्हे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे की, “शपथविधीची आपल्याला काहीच कल्पना नव्हती. मी वेगळ्या चर्चेसाठी अजित पवारांकडे गेलो होतो. त्यावेळी अचानक शपथविधी झाला. पण माझी भावना आहे की, मी शरद पवार साहेबांसोबतच आहे. मी जाहीरपणे सांगतोय, साहेबांना भेटूनही सांगेन की मी त्यांच्यासोबतच आहे.





