मनसेने वेधले पोलिस अधीक्षकांचे लक्ष.!
कुडाळ : येथील हॉटेलमधील त्या आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी प्रसाद गावडे करावी, अशी मागणी मनसेने जिल्हा , पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. ही आत्महत्या की घातपात यापेक्षा अनैतिक धंद्यांच्या मागील रॅकेटचा बिमोड होणे आवश्यक असल्याबाबतही मनसेने लक्ष वेधले आहे. याबाबतचे निवेदन माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी पोलिस अधीक्षकांना दिले.
कुडाळ येथील एका हॉटेलमध्ये अलीकडेच मुंबई येथील विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर सदरची महिला मुंबईहून कुडाळच्या त्या हॉटेलमध्ये नेमक्या कोणत्या कारणासाठी आलेली होती तिच्या शेजारच्या रूममध्ये असणारे ते दोघे युवक यांचा तिच्याशी नेमका कोणता संबंध होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित असून संपूर्ण प्रकरण संशयास्पद वळणावर आहे.
महिलेची आत्महत्या की घातपात यापेक्षा या प्रकरणाशी संबंधित रॅकेटचा शोध पोलिस प्रशासनाने घ्यावा. सदरील प्रकरणाचा थेट संबंध जिल्ह्यात स्थानिक पातळीवर चालू असलेल्या वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या रॅकेटशी असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे. ओरोस व कुडाळमधील काही हॉटेल्समध्ये सेक्स रॅकेट कार्यरत असल्याच्या तक्रारी याआधी होऊन देखील स्थानिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे त्याला अधिक खतपाणी मिळाले आहे. तरुण पिढी बरबाद करणाऱ्या अनैतिक व्यवसायांच्या रॅकेटचा मुळासकट बिमोड व्हावा यासाठी सदर प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.





