कोल्हापुरात गोकुळ शिरगाव एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग…!

कोल्हापूर : कोल्हापुरात आज दुपारी गोकुळ शिरगाव एमआयडीसीत एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली काही वेळापूर्वीच ही आग आटोक्यात आली आहे. अंदाजे 60 ते 70 कोटी रुपयांचं या आगीमुळे नुकसान झालं असल्याच सांगण्यात आलं. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचं पोलीस सूत्रानी सांगितलं. या आगीमुळं एकच खळबळ उडाली.

आग इतकी भीषण होती की, संपूर्ण कंपनीला या आगीनं गिळंकृत केल्याचं दृश्य दिसत होतं.
कोल्हापूर शहराला लागून असलेल्या गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील सेराफ्लक्स युनिटमध्ये ही भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार,दुपारी तीनच्या सुमारास कंपनीमध्ये आग लागली. या आगीचे धुराचे लोट राष्ट्रीय महामार्गावरून दिसत आहेत. यावरून आगीची भीषणता लक्षात येत होती. ही आग कशामुळं लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून सगळीकडं मोठे धुराचे लोट दिसत होते. मात्र, जीवितहानी टाळण्यासाठी रुग्णवाहिका आग लागलेल्या परिसरात तैनात करण्यात आल्या होत्या. गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्या आहेत. केमिकल कंपनीत आग लागल्यानं इतर कंपन्यांकडं आग पसरू नये, यासाठी काळजी घेतली गेली.