राजापूर : उद्धव ठाकरे कोकणात पर्यटक म्हणून येतात परंतु येथे आल्यावर कोकण वासियांमध्ये भांडणे लावतात असा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी राजापुरात केला. बारसू प्रकल्पाला समर्थन म्हणून माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते .या मोर्चामध्ये त्यांच्या समवेत माजी आमदार प्रमोद जठार , भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली , जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर , आदी मान्यवर सहभागी झाले होते . यावेळी मोर्चेकरांनी “रिफायनरी आमच्या हक्काची , नाही कुणाच्या बापाची” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला . यानंतर मोर्चा राजापूर तहसीलदार कार्यालयाकडे नेण्यात आला. मोर्चेकर्यांनी तहसीलदार यांना बारसू रिफायनरी समर्थनार्थ निवेदन सादर केले .यावेळी सर्व नेत्यांनी ही समर्थनाची केवळ सुरुवात असून यापुढे समर्थनाची विशाल सभा घेण्यात येईल असे सांगितले .





