हे दलालांसाठी काम करणारे सरकार | बारसूत उद्धव ठाकरेंचा घणाघात

92

राजापूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बारसू परिसराला भेट दिली. त्यावेळी ठाकरे यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवरही निशाणा साधला. वेदांता – फॉक्सकॉनसारखा प्रकल्प गुजरातला नेला. त्यानंतर पर्यावरणाला हानिकारण ठरणारा प्रकल्प महाराष्ट्राला दिला. चांगले प्रकल्प राज्याबाहेर जाताना सरकार शांत बसले होते. आता बारसू परिसरातील रिफायनरीसाठी पोलिसी बळाचा वापर करीत आहे. स्थानिक नागरिकांवर गुन्हे दाखल करून त्यांना तडीपार केले जात आहे. मातीची चाचणी घेता तशी लोकांचे मतेही जाणून घ्या. सध्या शिंदे-फडणवीस सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

परिसरात अनेक परप्रातियांच्या जमिनी आहेत. त्यामुळे येथे काहीतरी कट शिजत असल्याचा आरोपही यावेळी ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, “हे सरकार उपऱ्यांसाठी दलाली करत आहे. येथे अनेकांच्या जमिनी आहेत. त्यामुळे त्यांना फायदा होण्यासाठी या प्रकल्प रेटला जात आहे. त्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांवर पोलिसी बळाचा वापर करून लाठीचार्ज केला जात आहे. यातून हे  सरकार सामान्यांचे नसून दलालांसाठी काम करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. हा प्रकल्प झाला नाही तर घेतलेल्या जमिनी शेतकऱ्यांना माघारी कराव्या लागतील. त्यामुळे दलालांसह संबंधितांचे नुकसान होईल. त्यातून कसल्याही स्थितीत हा प्रकल्प मार्गी लावण्याचे काम सरकार करीत आहे.”