कणकवली : रेल्वे प्रवासादरम्यान युवतीची छेडछाड करून तिच्यावर अत्याचार करणारा तो ३० वर्षीय संशयित युवक हरियाणातील नव्हे तर दिल्लीतील असल्याचे स्पष्ट झाले असून गेला महिनाभरापासून तो सिंधुदुर्गात असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. रेल्वे स्टेशन परिसरात त्याचा वावर असे. तो मेंटल नाही परंतु विकृत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी दुपारी तो त्या पीडित युवती पाठोपाठ रेल्वेतील पाठीमागच्या दिव्यांगांच्या डब्यात चढला, तेथे त्याने युवतीसमोर अश्लील प्रकार केले. त्यात ती युवती घाबरली आणि रेल्वेचा वेग कमी झाला असताना त्या युवतीने उडी मारली. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. त्याच अवस्थेत त्याने त्या युवतीवर अत्याचार केले. त्यानंतर त्यानेच पुढे गेटमनला युवती पडल्याचे सांगितले. नंतर रेल्वे पोलिस घटनास्थळी येवून तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांना बघितल्यानंतर तिने झाला प्रकार पोलिसांना सांगितला. त्याचवेळी त्याला ताब्यात घेण्यात आले.
याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अनिल जाधव करत आहेत. त्याच्या हाताच्या ठशावरून त्याचे आधार कार्ड लिंकचा पत्ता काढल्यानंतर तो दिल्लीतला असल्याचे स्पष्ट झाले. तो दिल्लीत सिव्हील डिफेन्समध्ये काम करत असे. गेल्या तीन महिन्यांपासून तो दिल्लीत नव्हता. सिंधुदुर्गात तो महिन्याभरापासून आहे. रेल्वे स्टेशन परिसरात काही मिळेल ते खायचे असे
करत तो रेल्वेतून फिरत असे. त्याने असेच काही गुन्हे केले आहेत का? याबाबतची माहिती पोलिस घेत आहेत. पोलिसांच्या तपासात ती युवती रत्नागिरीकडे जाण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या टोकावर आली आणि गाडी सुरू झाली असताना ती दिव्यांगांच्या डब्यात बसली. पाठोपाठ तो युवक त्या डब्यात घुसला.
गाडीच्या शेवटी दिव्यांगांच्या डब्याच्या पुढे झेंडा दाखविणाऱ्या गार्डचा डबा असतो. खरेतर गार्डने समयसुचकता दाखवत युवती पाठोपाठ दिव्यांगाच्या डब्यात घुसलेल्या त्या युवकाला बाहेर काढणे आवश्यक होते. संबंधित गाडीमध्ये गार्ड कोण होता? त्याने समयसुचकता का दाखवली नाही? या अनेक बाबींचा तपास पोलिस करत आहेत.





