देवगड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण भारतभर शुद्ध पेयजल प्रकल्पाचे काम भाभा अनुसंशोधन केंद्र मुंबई द्वारे चालू झाले आहे. याच योजनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला शुद्ध पेयजल प्रकल्प देवगड तालुक्यातील कुणकेश्वर ग्रामपंचायतीला मिळाला आहे.
ताशी एक हजार लिटर शुद्ध पाणी देण्याची क्षमता असणाऱ्या या प्रकल्पाचे उद्घाटन चंद्रकांत घाडी सरपंच कुणकेश्वर व प्रसिद्ध साहित्य कमलेश गोसावी यांच्या हस्ते झाले. यावेळी भाभा अनुसंशोधन केंद्र मुंबईचे शास्त्रज्ञ बिपिन नैलवाल रूपाली एक्वाच्या रिया मॅडम, कुणकेश्वर देवस्थान अध्यक्ष संतोष लब्दे, डॉ विद्याधर तायशेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
शुद्ध पाण्याचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व लक्षात घेता शालेय विद्यार्थी ग्रामस्थ आणि प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिराकडे येणाऱ्या भाविकांसाठी या प्रकल्पाचा फायदा होणार असल्याचे मत उद्घाटक कमलेश गोसावी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. शिवाय या प्रकल्पामुळे गावातील युवकांना रोजगार मिळू शकतो ही कल्पना त्यांनी व्यक्त केली.
भाभा अनुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ बिपिन नैलवाल यांनी आपल्या भाषणात सांगितलं की शुद्ध पाण्याबरोबर कृषी क्षेत्रातही संशोधन मोठ्या प्रमाणात चालू आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या संशोधनाची आवश्यकता भासल्यास बाबा अनुसंशोधन केंद्र आपणास वेळोवेळी मदत करील याची त्यांनी ग्वाही दिली. सूत्रसंचालन व आभार प्रमोद शेटे यांनी केले.





