लोखंडी प्लेटसाठी केलेला खर्च पाण्यात..? | कणकवली शहरासह आजूबाजूच्या गावांच्या तोंडचं पाणी पळण्याची वेळ

कणकवली |  मयुर ठाकूर : कणकवली शहरासह आजूबाजूच्या गावांची तहान भागविणारे गडनदीपात्रातील केटी बंधारे हे मार्च अखेरीसच कोरडे पडले आहेत. याचा परिणाम नळ पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांवर होणार आहे. त्यामुळे यंदा गडनदीपात्रालगत असलेल्या गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा शिवडाव धरणाचे पाणीही लवकर सोडावे लागण्याची शक्यता आहे.

कनकनगर व मराठा मंडळालगत असलेल्या गडनदीच्या पात्रातील केटी बंधाऱ्यांवर दरवर्षी डिसेंबरअखेरीस लोखंडी प्लेटस् घालून पाणी अडविले जाते. मात्र, यंदा या प्लेटस् व्यवस्थित न बसविल्याने बंधाऱ्यांमध्ये साठणारे पाणी वाहून गेले आहे. परिणामी पाण्याअभावी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. दरवर्षी या बंधाऱ्यांत एप्रिल अखेरीस पाण्याचा साठा असतो. त्यामुळे कणकवली शहरासह लगतच्या गावांच्या नळयोजनांना या पाण्याचा फायदा होतो. पाणीटंचाईची झळही कमी बसते. यंदा या बंधाऱ्यांवरील लोखंडी प्लेटस्मध्ये अनेक ठिकाणी लिकेज राहिल्याने पाणी वाहून गेले आहे. परिणामी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. ज्या उद्देशाने प्लेटस् घालण्यासाठी केलेला खर्च करण्यात आला, तो वाया गेल्याचे दिसून येत आहे.

यंदा मार्च महिन्यात तापमानात वाढ झाली आहे. अजून एप्रिल आणि मे असे दोन महिने उकाड्याचे जाणार आहेत. पाणी पातळीत घट झाल्यास यंदा विहिरीच्या पातळीत घट होणार आहे. याचा सर्वाधिक परिणाम नळपाणीपुरवठा योजनांवर होणार आहे. या योजना गडनदी पात्रातील साठ्यावर अवलंबून आहेत, पण यंदा बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाल्याने या नदीपात्रातील पाण्यावर अवलंबून असलेल्या अनेक गावातील नळयोजनांद्वारे लोकांना पाणीपुरवठा करताना कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे यंदा अनेक गावांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.