मुंबई : चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयात इंजेक्शन दिल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आता न्यायालयात धाव घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर, याप्रकरणात तक्रार दाखल केलेल्या औषध विक्रेत्यांचे परवाने स्थगित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
सैफी रुग्णालयामध्ये एका रुग्णाला ‘ऑरोफर’ हे इंजेक्शन दिल्यानंतर त्याची प्रकृती अधिकच बिघडली. त्याला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्या रुग्णाचा मृत्यू झाला. याप्रकरणी रुग्णाच्या नातेवाईकांनी ४ नोव्हेंबर रोजी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली. याची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने तातडीने रुग्णालयातील इंजेक्शनचे नमुने तपासणीसाठी घेतले आणि इंजेक्शनचा साठा जप्त केला. तसेच देशभरात वितरित करण्यात आलेल्या इंजेक्शनचा साठा परत मागवण्याचे निर्देश कंपनीला दिले होते.





