मालवणात झालेली विकासकामे भाजप युती सरकारच्या माध्यमातून | आ. नाईक यांनी फुकाचे श्रेय घेणे थांबवावे

66

मालवण : राज्यातील भाजप युती सरकारच्या माध्यमातून मालवण तालुक्यात मोठा विकास निधी आला आहे. मात्र याचे फुकाचे श्रेय आमदार वैभव नाईक आणि त्यांचा कंपू घेत असून जनतेची दिशाभूल करत आहेत. मालवण शहर व तालुक्यात आलेल्या विकानिधीचे श्रेय केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांचेच आहे. अशी भूमिका भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी स्पष्ट केली आहे.

मालवण भाजप कार्यालय येथे माहिती देण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी जिप सभापती महेंद्र चव्हाण, माजी उपसभापती राजू परुळेकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, मोहन वराडकर, महेश सारंग, युवमोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, सुशांत घाडीगांवकर, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, बबन परब, सुशील शेडगे, निकम यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर म्हणाले, आमदार वैभव नाईक गेल्या दहा वर्षात मालवण मध्ये एक इंचही सागरी धूपप्रतिबंधक बंधारा बंधू शकले नाही. यापूर्वी नारायण राणे यांच्या माध्यमातून चिवला बीच, दांडी व राजकोट येथे बंधारा कम रस्ता झाल्याने तेथील किनारपट्टी सागरी अतिक्रमणापासून सुरक्षित होऊन आज त्याठिकाणी पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे. हे बंधारे त्यावेळी मी आणि दीपक पाटकर यांनी मागणी केल्यामुळे ना. राणे यांच्या प्रयत्नाने झाले होते. दांडी येथे उर्वरित किनारपट्टीवर देखील बंधारा कम रस्ता होणे आवश्यक असताना आम. नाईक यांनी त्याठिकाणी केवळ दगडी बंधारा बांधण्याचा घाट घातला आहे. त्यास दांडी वासियांचा विरोध आहे. ही बाब आम्ही केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आणली असून त्यांनी या बंधाऱ्यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले आहे. त्यांच्याकडून या बंधाऱ्याबाबत निश्चित योग्य ती कार्यवाही होईल. आम. नाईक व त्यांच्या चमूने जनतेची दिशाभूल करण्याचे काम बंद करावे, असे सुदेश आचरेकर म्हणाले.

धोंडी चिंदरकर म्हणाले, ज्यावेळी सत्तेत होता, तुमचे मुख्यमंत्री होते. तेव्हा विकासकामे करणे शक्य झाले नाही. मात्र आज सत्ता नाही. विरोधी बाकावर असताना भाजप युती सरकारच्या माध्यमातून झालेली विकासकामे आपली सांगण्याचे काम आमदार वैभव नाईक व त्यांचा कंपू करत आहेत. जनतेची दिशाभूल करणे हेच आमदार वैभव नाईक यांचे काम आहे. अशी टीका भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केली आहे. ठाकरे सरकार असताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा कोणताही मंजूर झाला नाही अथवा काम पूर्ण झाले नाही. त्याउलट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुमारे ४२ कोटी निधीतून मुख्यमंत्री सडक योजनेची कामे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली. आताही भाजप युती सरकार माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामे होत आहेत. मोठ्या प्रमाणात विकासनिधी बंधारे यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांचे विशेष प्रयत्न आहेत. असे विजय केनवडेकर यांनी सांगितले