कणकवली : नाटळ येथील गडनदीपात्रानजीक मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत वृद्ध अज्ञाताचा मृतदेह असल्याची घटना घडली होती. कणकवली पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील यांच्या टीमने घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पाहाणी केली. या घटनेचे वृत्त क्षणार्धातच प्रसारित झाले. दरम्यान नक्की हा मृतदेह कोणाचा ? आणि इथे कसा ? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. तपास काम सुरू असतानाच मृतदेहाची ओळख पटली. गेल्या महिना भरापासून बेपत्ता असलेले हरकुळ खुर्द येथील मधुकर नारायण मलये (वय – ७५) हे बेपत्ता होते. शुक्रवारी सकाळच्या सुमारास नाटळ येथील गडनदी पात्राच्याकडेला असलेल्या झाडाला गळफास घेऊन मयत स्थितीत आढळून आला तो मधुकर मलये यांचाच असल्याचे मलये यांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी पाहणी दरम्यान सांगितले. मृतदेह बराचसा कुजलेल्या स्थितीत होता. मात्र अंगावरील पॅन्ट व करगोट्यावरून मधुकर यांची ओळख पटली.
सविस्तर वृत्त असे की, नाटळ येथील नदीपात्रानजीक एक मृतदेह सडलेल्या स्थितीत असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. याबाबतची माहिती समजताच पोलीस निरीक्षक अनिल जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, उपनिरीक्षक सरदार पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान बेपत्ता मधुकर मलये यांच्या कुटुंबियांनाही बोलविण्यात आले. त्यांनी मृतदेह मधुकर मलये यांचा असल्याचे मान्य केले.





