सिंधुदुर्गनगरी : महिला दिन हा महिला सबलीकरणाचा दिवस आहे . स्त्रीने माता , भगिनी , पत्नी ही नाती जोपासतानाच कोणताही न्यूनगंड न बाळगता आपलं स्वतंत्र अस्तित्व आत्मविश्वासाने दाखवायला हवे , असे प्रतिपादन मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा उमा सुरेश प्रभू यांनी केले . उमा प्रभू जन शिक्षण संस्थान , सिंधुदुर्ग यांच्यावतीने प्रशिक्षकांकरिता आयोजित क्षमता विकास कार्यशाळेत अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या.

विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार पुरस्कृत मानव साधन विकास संस्था, संचलित जन शिक्षण संस्थान – सिंधुदुर्गच्यावतीने संस्थेच्या सर्व प्रशिक्षकांकरीता “क्षमता विकास कार्यशाळा”‘ या कार्यक्रमाचे आयोजन केले . या कार्यक्रमात प्रमुख अतिथी सौ. उमा सुरेश यांच्या समवेत जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्गचे अध्यक्ष डॉ. शरद सावंत , योगेश प्रभू , रश्मी सामंत , सुधीर पालव , रमाकांत मेस्त्री , रमेश खरात आदी मान्यवर उपस्थित होते .जन शिक्षण संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवते . याद्वारे उद्योग आणि उद्योजक निर्माण केले जातात . जिल्हाभर असणारे प्रशिक्षक यांच्या क्षमतेमध्ये सुधार व्हावा यासाठी क्षमता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले . यामध्ये उपस्थित प्रशिक्षकांना व्यक्तिमत्व विकास आणि संभाषण कौशल्य , प्राशिक्षणानंतर अर्थसहाय्य मार्गदर्शन , यशस्वी उद्योजकाची गुरुकिल्ली , कौशल्य आणि स्वयंरोजगार आदी विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले . क्षमता विकास कार्यशाळेत सहभागी प्रशिक्षकांनी याबाबत समाधान व्यक्त केले. महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या क्षमता विकास कार्यक्रमात महिला प्रशिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला.





