एक्साइजच्या कुडाळ पथकाला मिळाली परफेक्ट टीप | भर रस्त्यात दारुमाफियांची उडवली विकेट

बांदा  : गोवा बनावटीची बेकायदा वाहतूक करणाऱ्या  विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कुडाळ भरारी पथक ऍक्शन मोडमध्ये आले आहे. दाणोली नागझरी व तळकट कुंभवडे रस्त्यावरील तळकट तिठा येथे दोन कारवाया केल्या. या दोन्ही कारवायांमध्ये ४८ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. दोन्ही कारवायांमध्ये तीन जणाना ताब्यात घेण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कचे कुडाळ पथक सतर्क झाले आहे. दाणोली येथील नागझरी समोरील सावंतवाडीरून आंबोलीकडे जाणा-या रस्त्यावर गोवा बनावटी दारुची अवैधरित्या वाहतूक करताना चारचाकी वाहनासह २९,५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसर्‍या कारवाईत तळकट कुंभवडे रस्त्यावर तळकट तिठा येथे गोवा बनावटी दारूची अवैधरित्या वाहतूक करताना चारचाकी वाहनासह १८ लाख ५५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही वाहनांमध्ये गोवा बनावटी दारुने भरलेले ४७० बॉक्स तसेच दोन चारचाकी वाहने (एमएच ०९ एफएल ६०२८ व  एमएच ०९ ईएम ५९२१) जप्त दारु व वाहनासहीत एकूण ४८ लाख ५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदेशीर वाहतूक करताना नेताजी एकनाथ भोसले (रा. जत, जि. सांगली), अतुल सोनबा कडुकर (रा. चंदगड जि. कोल्हापूर) व मनोहर रवळु गावडे (रा.चंदगड जि. कोल्हापूर) यांना कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग विभागाचे विभागीय उपआयुक्त, डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमित पाडळकर, दुय्यम निरीक्षक राहुल मोरे, रमाकांत ठाकूर, जवान शरद सांळुखे, महिला जवान मयुरी चव्हाण, हेमंत वस्त यांनी कारवाई केली. पुढील तपास कुडाळ निरीक्षक अमित पाडळकर करीत आहेत.