देवगड : माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या शेवटच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात म्हणाले होते. मात्र शिवसेनेने ज्यांना मोठे केले त्यांनीच बाळासाहेबांचे शब्द विसरून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसत आणि भाजपच्या साथीने दगाबाजी करून उद्धव ठाकरे यांचे सरकार खाली खेचले. गद्दारांनी खोटेपणाने शिवसेनेचे नाव व चिन्ह चोरले आहे, मात्र त्यांना बाळासाहेबांनी रुजविलेला शिवसेनेचा विचार चोरता येणार नाही. अशा खोकेवाल्या गद्दारांना गाडल्याशिवाय आणि उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनविल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही,असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी देवगड येथे करत देवगड तालुक्यातील सरपंच, नगराध्यक्ष, नगरसेवक यांचे समवेत तालुक्यातील शिवसैनिक असून “उडाले ते कावळे राहिले ते मावळे” त्या मावळ्यांना सोबत घेऊन शिवसेनेचे निष्ठावंत खंबीर शिवसैनिक पुढे चालत राहतील आणि आमचे चिन्ह आमच्या मागून येईल.
हा रामाचा धनुष्यबाण रावणाच्या हातात रहाणार नाही. विजय हा सच्चा शिवसैनिकांचाच असेल, असा इशाराही त्यांनी देवगड इंद्रप्रस्थ हॉल येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित शिवगर्जना मेळाव्या दरम्यान दिला.
या शिवगर्जना मेळाव्याचे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, जिल्हा युवासेना प्रमुख सुशांत नाईक, युवासेना उपजिल्हा प्रमुख निनाद देशपांडे, महिला जिल्हासंघटक नीलम सावंत पालव, तालुका प्रमुख मिलिंद साटम, जयेश नर, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, नगरसेवक निवृत्ती तारी, महिला तालुका संघटक हर्षा ठाकूर, स्वप्नाली वाल्मिकी व अन्य नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सुभाष देसाई यांचा सत्कार देवगड तालुका ठाकरे सेना याच्या वतीने. देवगड सरपंच, उपसरपंच, नगरपंचायत यांच्या वतीने करण्यात आला.
गद्दारांनी शिवसेनेचे चिन्ह व नाव चोरले. चोरलेल्या धनुष्यबाणाचा उपयोग काय ? नाव चोरा, निशाणी चोरा, जनता त्यास भीक घालत नाही. जनता ही उद्धव ठाकरेंच्याच बाजूने आहे. म्हणूनच अंधेरीच्या निवडणुकी नंतर निवडणूक घेण्याची भाजप व शिंदेची हिंमत नाही. भाजपचे लोकही निवडणुकीला घाबरत आहेत. आज उद्धव ठाकरे यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री तसेच ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री स्टॅलिन, नितीश कुमार आदी नेते पाठिंबा देत आहेत.
जेवढं वाईट करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, परंतु काही झाले तरी आम्ही शिवसैनिक
डगमगणार नाही, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई म्हणाले.





