कणकवली : निसर्गाचा ऱ्हास न होता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे यासाठी शिवसेनेने प्रयत्न केले आहेत. सध्याचा काळ संकटाचा असला तरी उद्धव ठाकरे संघर्ष करीत आहेत. या संघर्षाच्या वाटेत अडचणी आहेत, खाचखळगे आहेत परंतु शेवटी विजय नक्की आहे. विकास करत असतानाच प्रत्येक हाताला काम देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आम्ही पाऊले टाकत आहोत. मनात राम आणि हाताला काम हेच शिवसेनेचे हिंदुत्व आहे.
महाराष्ट्रातील शिवसैनिकांप्रमाणे कुडाळ व मालवण मधील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. याचा आपल्याला अभिमान आहे. हि शिवसेनेने मिळविलेली संपत्ती आहे. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह चोरले गेले आहे. तरीही येत्या निवडणुकांत १०० टक्के यश मिळाले पाहिजे हा निश्चय करून कामाला लागा. कुडाळ मतदारसंघ आपला हक्काचा आहे. परंतु शेजारच्या सावंतवाडी आणि कणकवलीत देखील आपले आ. निवडून आले पाहिजेत असे आवाहन शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज कुडाळ तालुक्याचा शिवगर्जना मेळावा महालक्ष्मी हॉल येथे आणि मालवण तालुक्याचा शिवगर्जना मेळावा समर्थ हॉल कोळंब येथे संपन्न झाला.


यावेळी सुभाष देसाई बोलत होते. या मेळाव्याचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. भगवी शाल घालून व पुष्पगुच्छ देऊन सुभाष देसाई यांचे आ. वैभव नाईक यांनी स्वागत केले.

यावेळी आ. वैभव नाईक म्हणाले, जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने कोणी विकास केला असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत.

सहा महिन्यापूर्वी शिवसेनेचे ९० टक्के आ. सोडून गेले. चार दिवसापूर्वी शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गेले. तरीही शेकडोंच्या संख्येने शिवगर्जना मेळाव्याला लाभलेली उपस्थिती हीच ठाकरे ब्रँडची किंमत आहे. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे.
शिवसेनेने सिंधुदुर्ग जिल्ह्याला भरभरून दिले आता तुम्ही आम्ही शिवसैनिकांनी शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांना साथ देणे गरजेचे आहे.





