कणकवली : नगरपंचायत हद्दीत गेले काही दिवस आचरा रस्त्यावर ठाण मांडून बसत असलेल्या मच्छी विक्रेत्यांवर कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या आदेशानुसार रात्री उशिरा ७ वा. च्या सुमारास कारवाई करण्यात आली. त्यामुळे अनेकांची तारांबळ देखील उडाली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अनेकदा या मच्छी विक्रेत्यांना मच्छी मार्केट मध्ये बसण्याच्या सूचना दिल्या होत्या. नगरपंचायत व कलमठ ग्रामपंचायत यांच्यावतीने संयुक्त कारवाई करण्यात आली होती. कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी या विक्रेत्यांना रस्त्यालगत बसण्यास मज्जाव केल्यानंतर मच्छी विक्रेत्यांनी कलमठ येथील मच्छी मार्केटमध्ये बसण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या.
मात्र अनेक वेळेचा सूचना पलीकडे जाऊन त्या सूचनांना केराची टोपली दाखवत कलमठ ग्रामपंचायतच्या कारवाईच्या भूमिकेनंतर हे विक्रेते लक्ष्मी चित्रमंदिर नजीक कणकवली हद्दीत सायंकाळच्या कार्यालयीन वेळ संपल्यानंतर ठाण मांडून बसू लागले. याबाबत नगरपंचायतने वारंवार आदेश देऊनही मच्छी विक्रेत्यांनी नगरपंचायतच्या आदेशांना केराची टोपली दाखवून पुन्हा रस्त्यालगत मच्छी विक्री सुरू केली. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणत होत होती.
त्यामुळे बुधवारी कणकवली नगरपंचायतच्या कारवाईनंतर काही विक्रेते हे कलमठ हद्दीत रस्त्यालगत बसून पुन्हा मच्छी विक्री करू लागल्याने कलमठ ग्रामपंचायत कर्मचारी कारवाईरिताता दाखल झाले. मात्र कलमठ ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या बोटचेप्या भूमिकेने हे विक्रेते सहीसलामत पळून जाण्यात यशस्वी ठरले. अचानक केलेल्या या कारवाईने मात्र मच्छी विक्रेत्यांमध्ये एकच धावपळ उडाली. सदरच्या कारवाईत नगरपंचायत कर्मचारी रवी म्हाडेश्वर, रमेश कदम आदी कर्मचारी सहभागी झाले होते.





