Home सिंधुदुर्ग पेंडूर येथे गवा रेड्यांपासून शेती व जीवितास धोका | ग्रामस्थांचे प्रशासनास निवेदन

पेंडूर येथे गवा रेड्यांपासून शेती व जीवितास धोका | ग्रामस्थांचे प्रशासनास निवेदन

मालवण : तालुक्यातील पेंडूर या गावात गेली दोन-चार वर्ष गवे रेडे यांनी प्रचंड हैदोस घातला आहे. शेतीचे नुकसान करून गवा रेड्यांनी स्थानिक ग्रामस्थांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतीचे नुकसान होत असल्याकारणाने पेंढुर गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सुरू असणारी भात शेती तसेच उन्हाळी शेती शेती करणे बंद केले आहे. भरवस्तीत रेडे येत असल्याने विद्यार्थी शेतकरी त्यांच्यावरील हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.

याबाबत प्रशासनाने लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही करावी असे निवेदन पेंडूर खराडे येथील ग्रामस्थांनी प्रशासनास दिले आहे. पेंडूर गावामध्ये शेतीचे प्रमाण जास्त आहे उन्हाळी पावसाळी शेती या गावात केली जाते परंतु शेतकऱ्यांना फायद्याच्या ऐवजी तोटा जास्त होत आहे. वन्य प्राण्यांपासून झालेल्या नुकसान भरपाई शासनाकडून अगदी तुटपुंज्या स्वरूपात दिली जाते. ही नुकसान भरपाई शासनाने वाढवून द्यावी अशी देखील मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

दुग्ध व्यवसाय हा येथील प्रमुख व्यवसाय आहे पहाटेच्या वेळी दूध संकलन केंद्रावर पोहोचताना गवारे यांची भीती शेतकऱ्यांसमोर असते. मागील काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी येथील ग्रामस्थ सुभाष सावंत यांच्या अंगावर गवा धावून आल्याने सावंत मोटरसायकल अपघाताने जखमी झाले होते. त्यांना जिल्हा रुग्णालय ओरस येथे उपचार करण्यात आले. अशा प्रकारच्या घटना घडल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत उपवनरक्षक सावंतवाडी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी पेंडूर ग्रामपंचायत सदस्य संदीप सावंत, संजय पेंडूरकर, मुरलीधर सावंत, गजानन सावंत व गव्या रेड्याच्या हल्ल्यात जखमी झालेले सुभान सावंत आधी ग्रामस्थ उपस्थित होते. याबाबत ग्रामस्थांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे देखील निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.