मडूरे येथे शिवजयंती उत्साहात साजरी…!

बांदा : मडूरे येथील श्री माऊली मंदिर परिसरात शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने गावात काढलेली शिवफेरी लक्षवेधी ठरली. यावेळी लहान मुले पारंपरिक वेषभूषेत वाहन फेरीत सहभागी झाले होते. छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने गावातील सर्व वाड्या व परिसर दुमदुमून गेला होता.

माऊली मंदिर परिसरातील सांस्कृतिक सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बालचमू चिंतू परब व स्वरा मोरजकर यांच्या हस्ते छत्रपतींना पुष्पहार घालण्यात आला. मडुरा माऊली मंदिरातून रेखवाडी, परबवाडी, देऊळवाडी, रेडकरवाडी, मडुरा तिठा, डिगवाडी व बाबरवाडी अशी वाहन फेरी काढण्यात आली. या फेरीत गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाबरवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर फेरीची सांगता झाली.