“दत्तकृपा” कॉम्प्लेक्समधील फ्लॅटधारकांना एसीबीच्या नोटिसा…
कणकवली : आ. वैभव नाईक यांची एसीबीकडून चौकशी सुरू असताना आता नव्याने कणकवली शहरातील ‘दत्तकृपा’ कॉम्प्लेक्समधील फ्लॅटधारकांना रत्नागिरीच्या एसीबीने चौकशीसाठी नोटिसा पाठवल्या आहेत. त्यामुळे आमदार नाईक यांनी बांधलेल्या सर्वच निवासी संकुलातील रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. ठाकरे गटात राहिलेल्या आमदार वैभव नाईक यांची रत्नागिरी एसीबीने चौकशी सुरू ठेवली आहे. यात महिन्यापूर्वी नाईक यांचा बंगला, दुकान, पाईप कारखाना तसेच इतर मालमत्तांची मोजमापे घेण्यात आली. त्यानंतर नाईक यांचा आमदार निधी ज्या ग्रामपंचायतींना वितरीत झाला, त्या ग्रामपंचायतींच्या कामांचीही चौकशी एसीबीकडून सुरू करण्यात आली.
तसेच काही विकाससंस्थांनाही एसीबीने नोटिसा बजावल्या. त्यानंतर आता आमदार नाईक यांनी बांधलेल्या बांधकरवाडी येथील दत्तकृपा संकुलातील ५६ फ्लॅटधारकांना चौकशीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसीमध्ये संबधित फ्लॅट धारकांनी फ्लॅट कसे खरेदी केले, तसेच पॅनकार्ड, आधारकार्ड साेबत आणण्याचे नमूद केले आहे. कणकवली शहरातील बांधकरवाडी, मधलीवाडी, परबवाडी या भागात नाईक यांनी निवासी संकुले उभारली आहेत. यातील दत्तकृपा या संकुलातील ५६ धारकांना नोटिसा आल्याने आता उर्वरीत संकुलातील रहिवाशांमध्येही खळबळ उडाली आहे.





