मिठमुंबरी गावच्या माजी सरपंच रिमा मुंबरकर होणार “आदर्श सरपंच” पुरस्काराने सन्मानित…!

173

देवगड : मिठमुंबरी ग्रामपंचायतच्या माजी सरपंच व पंचशील महिला मंडळाच्या विद्यमान सचिव रिमा राजेंद्र मुंबरकर यांनी आपल्या सरपंच पदाच्या पाच वर्षाच्या कालावधीत मिठमुंबरी गावाच्या विकासात उल्लेखनीय काम केले. मिठमुंबरी ग्रामपंचायत क्षेत्रात शासनाच्या विविध योजना राबवून त्या यशस्वी केल्या, तसेच महिला वर्गासाठी विविध उपक्रम राबविले. याबद्दल साने गुरुजी आरोग्यमंदिर सांताक्रुज मुंबई या संस्थेच्या वतीने त्यांना या वर्षीच्या आदर्श सरपंच पुरस्कार पुरस्काराने मुंबई येथे दिनांक 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गौरविण्यात येणार आहे.

दरवर्षी ही आदर्श सरपंच निवड प्रक्रिया मुंबई येथील गेली 30 वर्षे पंचायतराज क्षेत्रात प्रशिक्षणाचे काम करणाऱ्या डॉ . पी व्ही मंडलिक ट्रस्टच्या वतीने करण्यात येते. रिमा मुंबरकर यांनी केलेल्या कामाची माहिती मंडलिक ट्रस्टच्यावतीने साने गुरुजी आरोग्य मंडळाला देण्यात आली होती. डॉ. पी. व्ही. मंडलिक ट्रस्ट व साने गुरुजी आरोग्य मंडळ या संस्थांनी त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या विविध ग्रामपंचायतीच्या सरपंच मधून रिमा मुंबरकर यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामाची दखल घेऊन त्याची निवड केली आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.