स्टोन क्रशरवर प्रशासन शांत का? कळसुली ग्रामस्थांचा ग्रामसभेत ठराव
कणकवली : तालुक्यातील कळसूली गावात अहोरात्र काळ्या दगडाची क्रशर स्टोन सुरू आहे. गेले काही महिने स्थानिक ग्रामस्थ आणि स्टोन क्रेशर मालक यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत आहे. हे स्टोन कशर जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांचे असल्याने प्रशासन मूक गिळून शांत बसलेलं चित्र पाहायला मिळत आहे. ग्रामस्थांनी या विरोधात आवाज उठूनही कोणतीही दखल घेतली जात नाही. आज पुन्हा एकदा स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून स्टोन क्रशरच्या विरोधात घोडगे फाटा येते रास्ता रोको केला आहे.


शिवडाव, कळसुलीमधील ग्रामस्थ सुद्धा या रास्ता रोको मध्ये सहभागी झाले आहेत. दोन विना लायसन्स डंपर अडवले आहेत. परंतू बेकायदेशीररित्या सुरु असलेले स्टोन क्रशर व क्वारी बंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होताना पाहायला मिळत आहे. यापूर्वी ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलन जाहीर केले होते.
या स्टोन क्रशर आणि काळ्या दगडांच्या क्वारीच्या उडणाऱ्या धुळीमुळे फळबागा अडचणीत आल्या असून याचा फटका मात्र स्थानिक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. तसेच बोअर ब्लास्टींगमुळे अनेक घरांना तडे गेले आहेत. डंपरवर ताडपत्री घालत नाहीत. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. स्टोन क्रेशरच्या विरोधात ग्रामसभेमध्ये क्वारी बंद करण्याबाबत ठराव करण्यात आला आहे. तरीही स्टोन क्रशर मालकांची मनमानी सुरू आहे. हे आंदोलन सरपंच सचिन पारधिये यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.





