मालवण : तारकर्ली रांजनाल्या येथील पुलाच्या कामाची मुदत संपूनही जोडरस्त्याचे काम मार्गी न लागल्याने माजी खासदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. अखेर त्यांच्या दणक्यानंतर रांज नाला जोडरस्त्याच्या कामास सुरवात झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
तारकर्ली रांज नाल्यावरील पुलाच्या कामाची मुदत संपूनही ते काम अपूर्ण होते. परिणामी ग्रामस्थ व पर्यटकांना या मार्गावरून ये-जा करताना त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी या ठिकाणी भेट देत अपूर्ण काम व जोड रस्त्यांचे काम तत्काळ मार्गी लागायला हवे अशा सूचना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
याची कार्यवाही न झाल्यास संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे असा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारास पंधरा दिवसात हे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. या पार्श्वभूमीवर आजपासून या पुलाच्या जोड रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.





