देवगड : आद्यपत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला सायंकाळी 7 ते 8 या वेळेत तीन दिवस संपन्न होणार आहे. देवगड उमाबाई बर्वे ग्रंथालय, स्नेहसंवर्धक मंडळ आणि राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
या व्याख्यानमालेसाठी पुणे येथील सचिन करंडे यांचे गुरुवार 5 जानेवारी रोजी अष्टपैलू स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि 6 जानेवारी रोजी भारतीय संस्कृतीपुढील आव्हान या विषयावर व्याख्यान होणार आहे. करडे हे लेखक शिवव्याख्याते इतिहास अभ्यासक आहेत. गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत. शनिवार 7 जानेवारी रोजी रत्नागिरी येथील डॉक्टर स्वराली शिंदे यांचे आजची पिढी आणि संस्कार या विषयावर व्याख्यान होणार आहे डॉक्टर शिंदे या रत्नागिरी येथे महाविद्यालयामध्ये अध्यापिका असून, त्यांनी प. ल. मयेकर यांच्या निवडक नाट्यकृतीचा चिकित्सक अभ्यासक या विषयावर संशोधन केले आहे.
तसेच वकृत्व, कथाकथन, निबंध, कविता, अभिनय या विविध कलाकौशल्यासाठी राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. या व्याख्यानमालांचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रंथालयाचे अध्यक्ष सागर कर्णिक व सचिव संजय धुरी यांनी केले आहे.




