देवगड (प्रतिनिधी)
ग्रेट शिवा ! स्वातंत्र्यदिनानिमित्त समाजसेवक शिवाजी तद्देवाडी यांचा सत्कार
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शिवप्रसाद पेडणेकर मित्र मंडळ देवगड तर्फे वयोवृद्ध समाजसेवक श्री. शिवाजी तद्देवाडी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पकुंडी आणि रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मंडळाचे सदस्य डॉ. सुनील आठवले, अभिराम देसाई, श्री. रविंद्र चिंदरकर, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. शुभम कुळकर्णी, सचिन मुणगेकर, श रोहन हिंदळेकर, रविंद्र शेलार, दशरथ, प्रसाद कदम, अथर्व पोकळे, शिवप्रसाद पेडणेकर आदी उपस्थित होते.
शिवप्रसाद पेडणेकर मित्रमंडळ गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांद्वारे समाजोपयोगी कामे करीत आहे .त्यात स्वच्छतेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा नारा दिला, मात्र आजही पुरेशी स्वच्छता कुठेच दिसत नाही. अनेकदा स्वच्छता फेरी काढली जाते, फोटो सेशन केले जाते; पण प्रत्यक्षात शहरांमध्ये स्वच्छतेची कृती दुर्लक्षित राहते. अशा वेळी ‘शिवा विथ फ्रेंड्स’ हे मित्रमंडळ मात्र कोणतीही अपेक्षा न ठेवता सातत्याने शहर स्वच्छ राहावे यासाठी कार्यरत आहे.
२०१७ पासून या मंडळाने देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या सहकार्याने स्वच्छतेच्या मोहिमेची सुरुवात केली. आजही नगरपंचायत कामगारांना हातभार लावत मंडळ शहरातील रस्त्यांवरून प्लॅस्टिक कचरा गोळा करत असते. पर्यटक किंवा स्थानिक नागरिक रस्त्यावर टाकलेल्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिक कचरा गोळा करून नगरपंचायतीच्या माध्यमातून त्याची विल्हेवाट लावली जाते. पावसाळ्यात गटारे अडून पाणी साचू नये यासाठी या मंडळाच्या कार्याचा मोठा उपयोग होतो.
स्वच्छतेच्या कामात सातत्य ठेवणाऱ्या आणि समाजासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असणाऱ्या अशा मंडळींचा छोटेखानी सत्कार करून त्यांचा योग्य सन्मान करण्याचे काम हे मंडळ करत आहे. खरंच, समाजातील दुर्मिळ अशा या माणसांना शोधून त्यांचा गौरव करणं ही मंडळाची खरी जमेची बाजू आहे.





