कुणकेश्वर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारची पहिली पूजा होणार श्रीमती अवंतिका कुलकर्णी, श्री एकनाथ तेली यांच्या हस्ते

19

 

देवगड (प्रतिनिधी)

कुणकेश्वर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारची पहिली पूजा होणार श्रीमती अवंतिका कुलकर्णी, श्री एकनाथ तेली यांच्या हस्ते

श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रावणी सोमवारी उत्सवाची परंपरा उत्साहात साजरी होत आहे. येत्या सोमवार, दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी तिसरा श्रावणी सोमवार असून, भाविक भक्तांच्या सोयीसाठी विशेष दर्शन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.

 

प्रशासनाच्या वतीने पोलिस बंदोबस्त आणि पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. प्रत्येक श्रावणी सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच मायभगवतीच्या हस्ते प्रथम पूजेनंतर दर्शनास सुरुवात होते. यंदा तिसऱ्या सोमवारी प्रथम पूजेचा मान श्रीमती अवंतिका कुलकर्णी, सहाय्यक धर्मादाय आयुक्त सिंधुदुर्ग व श्री एकनाथ तेली, अध्यक्ष श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, यांना देण्यात आला आहे.

 

प्रथम पूजा संपल्यानंतर सकाळी सुमारे ६.०० वाजता भाविकांना दर्शनास सुरुवात होईल. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात विशेष रांग व नियोजित मार्ग आखण्यात आला आहे. मंदिरात सकाळी ६:०० ते रात्री ८:०० या वेळेत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

याशिवाय संध्याकाळी महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाईल. सर्व शिवभक्तांनी दर्शन व उत्सवाचा लाभ घ्यावा, तसेच ट्रस्ट आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ट्रस्ट अध्यक्ष श्री एकनाथ तेली यांनी केले आहे.