गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हलरची दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला. विनोद दिवाकर मोरये (३१, रा. नांदगाव-शिसयेवाडी) असे त्याचे नाव आहे. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास नांदगाव येथे झाला. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅव्हलर चालक महेश राठोड (२८, रा. बेळगाव, कर्नाटक) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रॅव्हलर चालक महेश राठोड हा गोव्याच्या दिशेने जात असताना समोरून जात असलेल्या दुचाकीस्वाराला ट्रॅव्हलरची जोरदार धडक बसली. या धडकेत दुचाकीस्वार विनोद मोरये हे जखमी झाले. त्यावेळीच संतोष बिडये मॉगिंग वॉक करून घरीत येत असता अपघात झाल्याचे त्यांना दिसून आले. अपघातस्थळी ते गेले असता विनोद हे बेशुद्धा अवस्थेत पडलेल्या दिसून आले. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमी विनोद यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यांना कणकवलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत संतोष शिवा बिडये (४९, रा. नांदगाव-बिडयेवाडी) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार अपघातास करणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅव्हलर चालक महेश राठोड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे करीत आहेत.