बारावी परिक्षेवर बहिष्काराचा आयटी शिक्षकांचा इशारा | संघटनेचे राज्य मंडळाच्या अध्यक्षांना निवेदन

168

सिंधुदुर्ग : राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन माहिती तंत्रज्ञान (आयटी) शिक्षक संघटनेच्या मागण्या मान्य न झााल्यास फेब्रुवारी – मार्च 2023 मध्ये माहिती तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाईन परिक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा राज्य संघटनेने दिला आहे. याबाबतचे निवेदन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षण राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिले.

निवेदनाचा आशय : बारावीसाठी माहिती तंत्रज्ञान हा विषय आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स या तिन्ही शाखांसाठी शिकवला जातो. या विषयाची परिक्षा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते. ही परिक्षा 23, 24 व 25 मार्च 2023 ला घेतली जाणार आहे. परिक्षा पार पाडण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षक हे तांत्रिक सहाय्यक अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान शिक्षक संबंधित शाळा महाविद्यालयावर अत्यंत मोलाची भूमिका बजावत आहेत. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारा विद्यार्थ्यांचे प्रवेश सर्व अनुदानित शाळांतील शिक्षकांचे शालार्थ प्रणालीद्वारे वेतन, त्यांचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांची सरल प्रणालीमध्ये माहिती भरणे, युडायस प्लस पोर्टलमध्ये माहिती भरणे, ऑनलाईन शिक्षण व प्रशिक्षण अशा सर्व शासनाच्या प्रक्रियेमध्ये तांत्रिक सहाय्य देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान शिक्षक 21 वर्षांपासून फक्त पाच हजार एवढ्याच मानधनावर प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. या शिक्षकांचे शासनाचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण शासनामार्फत पूर्ण झाले आहे.
अत्यंत महत्त्वाच्या विषयाबाबत शासनस्तरावर वेतन अनुदान देणे उच्च माध्यमिक स्तरावरील माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांना वेतनापोटी अनुदानाची तरतूद करण्यासाठी शासनाने माहिती संकलन प्रक्रिया पूर्ण केली आहे. ही फाईल 21 वर्षांपासून शासन निर्णयासाठी प्रलंबित आहे. या ‍ शिक्षकांना वेतन अनुदान मिळावे. त्यांची 2001-02 पासूनची सेवा ग्राह्य धरण्यात यावी आदी मागण्या पूर्ण कराव्यात. याबाबत कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांनी माहिती तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाईन परिक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे

दीड लाख विद्यार्थ्यांची असुविधा
राज्यातील सर्व विभागातील अंदाजे दोन हजारांपेक्षा अधिक माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षक सहभागी होणार आहेत. सुमारे एक लाख 60 हजार विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाईन देताना असुविधेचा सामना करावा लागेल, अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल पाटील, सचिव विशाल शिंदे व उपाध्यक्ष नितीन राऊळवार, नंदकुमार जाधव, संजय पवार, प्रशांत भावसार आदी पदाधिकाऱ्यांनी दिली.