सावंतवाडी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाकडून होऊ घातलेला शक्तिपीठ महामार्ग हा स्वार्थपीठ आहे – माजी खासदार राजू शेट्टी
महाराष्ट्र शासनाकडून होऊ घातलेला शक्तिपीठ महामार्ग हा स्वार्थपीठ आहे. या महामार्गामुळे राज्य कर्जाच्या खाईत लोटणार असून हा महामार्ग रद्द होण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहील. फटके मारून १२ जिल्ह्यांच कल्याण होणार असेल, महामार्ग रद्द होत असेल तर ते फटकेही खायला मी तयार राहील. हा महामार्ग रद्द झाल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही असे विधान शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
श्री शेट्टी हे सावंतवाडीत आले असता त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक, कॉम्रेड संपत देसाई, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सतीश सावंत, डाॅ जयेंद्र परुळेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, रुपेश राऊळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गुडेनवर, प्रांतिक सदस्य संग्राम कुपेकर, कोल्हापूर जिल्ह्याचे ठाकरे सेना जिल्हाप्रमुख नागेश चौगुले, मनसेचे जिल्हाप्रमुख विद्याधर गुटवे, काँग्रेसचे सरचिटणीस ॲड.मळवीकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजू शेट्टी पुढे म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग विरोधात आम्ही उभा केलेला लढा हा राजकीय नाही. तर हा लढा भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी आहे. पर्यावरण वाचविण्याबरोबरच सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसाधारण जनतेला महापुरापासून वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी उभारण्यात आलेला आहे. शासनाने या महामार्गासाठी 86 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. मात्र, सरकारच्या कार्यपद्धतींचा विचार करतात कुठलाच प्रकल्प हा सांगितलेल्या रक्कमेत पूर्ण झाला नाही ही वस्तुस्थिती असून शक्तीपीठ हा प्रकल्प दीड लाख कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. हा खर्च शासनाला परवडणारा नसून राज्य कर्जाच्या खाईत लोटणार आहे. एकीकडे पुणे बेंगलोर हा आठ पदरी ग्रीनफिल्ड महामार्ग 700 किलोमीटर लांबीचा 50 हजार कोटी मध्ये होणार आहे. मात्र, 802 किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग हा सहा पदरी असताना त्याला 86 हजार कोटी एवढा खर्च नेमका कशाला ? हा प्रश्न आहे. त्यामुळे या शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून सरकार भ्रष्ट मार्गाने पन्नास हजार कोटी रुपये काढणार आहे. हे पन्नास हजार कोटी हे जनतेच्या खिशातून जाणार आहे. म्हणूनच देवाधर्माच्या नावाखाली जनतेच्या माथी लादल्या जाणाऱ्या या महामार्गाला आमचा विरोध आहे.





