सिताराम पारधिये यांचे स्वरचित गीत शिक्षण परिषदेत विशेष भावले

5

 

कणकवली ( प्रतिनिधी)

सिताराम पारधिये यांचे स्वरचित गीत शिक्षण परिषदेत विशेष भावले

साळिस्ते केंद्राची पहिली शिक्षण परिषद नुकतीच केंद्र शाळा साळिस्ते नं.1 तालुका कणकवली ,जिल्हा सिंधुदुर्ग या शाळेत संपन्न झाली. शिक्षण परिषदेची सुरुवात गोपाळ जाधव केंद्रप्रमुख यांनी दीप प्रज्वलन करून केली. सरस्वती देवीला पुष्पहार समीर ताम्हणकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती साळिस्ते नं. 1यांनी अर्पण केला.
या शिक्षण परिषदेचे खास वैशिष्ट्य म्हणजे पदवीधर शिक्षक सिताराम पारधिये यांचे स्वरचित गीत , तुम्ही साळिस्त्याक येवा नि बघून जावा….. हे स्वागत पद्य उपस्थित सर्व शिक्षक वृंद व केंद्रप्रमुख यांना खास भावले. या गीताला संगीत हार्मोनियम साथ पारधिये यांनी दिली. तबला साथ शाळेचा विद्यार्थी अर्णव रांबाडे या चिमुकल्याने दिली. या गीताचे गायन शाळेतल्या विद्यार्थ्यांनी केले. गीताचे बोल ,ताल .लय इतका सुंदर होता की , सर्व उपस्थित मंत्रमुग्ध होऊन गेले. या छान सादरीकरणा बद्दल केंद्रप्रमुख गोपाळ जाधव यांनी पारधिये सर यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
या परिषदेला मार्गदर्शक म्हणून अर्चना तळगावकर पदवीधर शिक्षिका व विश्वनाथ चव्हाण उपशिक्षक यांनी केले. या परिषदेला साळिस्ते केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते. शिक्षण परिषद यशस्वीतेसाठी संगीता वळवी उपशिक्षिका ,माधवी बुचडे उपशिक्षिका ,शाळेचे मुख्याध्यापक संजना ठाकूर यांनी विशेष मेहनत घेतली. शेवटी आभार प्रदर्शन दिनेश जंगले पदवीधर शिक्षक यांनी मानले.