आंघोळीसाठी उतरलेला ७ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू ; शेर्ले – कापई येथील घटना
शेर्ले – कापई येथील सिमेंट नाला बंधाऱ्यात आंघोळीसाठी उतरलेला ७ वर्षीय बालक बुडून मयत झाला. पंतू उर्फ नील शिवा कलिया गौतम (रा. छपिया, उत्तरप्रदेश) असे त्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. आईवडील आठवडा बाजाराला गेल्याची संधी साधून नील अन्य तिघा मित्रांसमवेत बंधाऱ्यात उतरला. स्थानिक युवक भूषण रुपजी याने मृतदेह बाहेर काढला. यावेळी नीलच्या आईचा आक्रोश हृदय हेलावणारा होता. बांदा पोलिसांसह एनडीआरएफची टीम मदतकार्यात सहभागी होती. बांदा पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नीलचे कुटुंबीय शेर्ले येथे मंदिराचे प्लास्टरचे काम करत आहेत. तेथेच पेडणेकर यांच्या घरी ते भाड्याने राहत होते. सोमवारी सकाळी नीलचे आईवडील आठवडा बाजारासाठी बांदा येथे गेले होते. आईवडील घरी नसल्याची संधी बघून नीलसह त्याचे चुलत भाऊ अमन कुमार सूर्यनारायण गौतम (११), शुभम शिवा गौतम (११) व बादल शिवा गौतम (९) हे सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास बंधाऱ्यात आंघोळीसाठी गेले.
पावसामुळे सिमेंट नाला बंधारा पूर्ण क्षमतेने भरला असून पाण्याचा वेगवान प्रवाह आहे. पाण्याचा अंदाज नसताना बादल व्यतिरिक्त तिघांनी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला उड्या मारल्या. यावेळी नील खोल पाण्यात जाऊन गटांगळ्या खाऊ लागला. हे पाहून अन्य दोघेजण घाबरले व ते बाहेर आले. काही वेळातच नील दिसेना. त्यांनी आरडाओरड केली व ते तेथून घाबरून पळाले.
नील बुडाल्याची माहिती त्यांनी घरी येऊन दिली. त्यानंतर स्थानिक घटनास्थळी दाखल झाले. बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे हे कर्मचारी सिद्धार्थ माळकर , बाळकृष्ण गवस, सीताकांत नाईक, तुषार वाघाटे यांच्यासह दाखल झाले. होडीच्या सहाय्याने शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र, नीलचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. दरम्यान, एनडीआरएफची टीम सुद्धा दाखल झाली. त्यांनी शोध मोहिमेत सहभाग घेतला. स्थानिक युवक भूषण रुबजी याने पाण्यात बुडून नीलचा मृतदेह बाहेर काढला.
यावेळी नीलच्या आई वडिलांनी केलेला आक्रोश हृदय हेलावणारा होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. सारंग यांनी शवविच्छेदन केले. पाण्यात बुडून नीलचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. बांदा पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.