कोर्ला सातंडी प्रकल्पग्रस्तांना संपूर्ण नुकसानभरपाई मिळवून दिली जाईल – पालकमंत्री नितेश राणे यांचे आश्वासन
कोर्ला सातंडी प्रकल्पग्रस्तांना संपूर्णपणे नुकसानभरपाई मिळवून देऊ, असे आश्वासन बंदर विकास, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
कुणकवण गावच्या सरपंच वैशाली पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नामदार नितेश राणे यांची भेट घेतली.यामध्ये सामाजिक कार्यकर्ते हरेश जनक, उपसरपंच मंगेश गुरव, हिराताई नर, जितेंद्र कदम, अनिल पवार, वासंती पाटणकर, अंकुश पाटणकर, राजाराम पाटणकर, बबन केसरकर, संतोष राणे आणि वसंत मोरे सहभागी होते.
कोर्ला सातंडी हा प्रकल्प देवगड तालुक्यातील कुणकवण गावात आहे. या गावातील प्रकल्पग्रस्तांनी नुकसान भरपाईसाठी व इतर मुद्द्यांसाठी आज नामदार नितेश राणे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. शासनाचा “निवाडा १२” नुसार घर, जमिनी अथवा झाडे यामधील जास्तीत जास्त भरपाईचा आकडा जो असेल तो मिळतो, असा निवाडा करण्यात आला आहे. यानुसार भरपाई देण्यात आली. मात्र, आपल्याला घरे, जमीन व झाडे या सर्वांचीच एकत्रित भरपाई मिळण्याची गरज आहे. नरडवे प्रकल्पांतर्गत पालकमंत्री नितेश राणे यांनी अशा प्रकारची नुकसानभरपाई तेथील प्रकल्पग्रस्तांना मिळवून दिली आहे. ही बाब लक्षात घेता त्याच प्रकारे भरपाई आपल्याला मिळावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. नामदार नितेश राणे यांनी ही मागणी मान्य करून या प्रकारे नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
कुणकवण गावचे सुपुत्र, भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी काही दिवसांपूर्वीच नामदार नितेश राणे यांच्याशी चर्चा केली होती.
कोंडवाडी, कुंभारवाडी तसेच, प्रकल्पग्रस्तांना सुमारे ३०० मीटर रस्ता पाटबंधारे खात्याने बांधून दिला होता. त्याची अवस्था आता गंभीर झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे भरून रस्त्याचे नूतनीकरण करून द्यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. ही मागणीही तात्काळ मान्य करून तसे आदेश नामदार नितेश राणे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. त्याचबरोबर, या प्रकल्पग्रस्तांसाठी स्मशानभूमी नसून, स्मशानभूमीसाठी पाटबंधारे खात्याने जागा उपलब्ध करून द्यावी, ही मागणीही प्रकल्पग्रस्तानि मांडली. नामदार नितेश राणे यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना सोमवारी गावाला भेट देऊन स्मशानभूमीसाठी कोणती जागा हवी आहे, याची पाहणी करून त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
कुणकवण शाळेजवळ येणारी एस.टी. बस वस्तीपर्यंत विकसित करावी, ही प्रमुख मागणीही शिष्टमंडळाने मांडली. गावापासून दीड ते दोन किलोमीटर चालत जाऊन बस पकडावी लागते. ती वस्तीवर यावी, अशी मागणी करण्यात आली. नामदार नितेश राणे यांनी याबाबतही होकारात्मक भूमिका घेत, बस सुरू होईल, असे पाहू, असे आश्वासन दिले आहे.