कणकवली (प्रतिनिधी)
पाकिस्तानचा झेंडा जाळून काश्मीर हल्ल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कणकवलीत केला तीव्र निषेध
मोदी-शहा, सरकार पाडण्यात,पक्ष फोडण्यात व्यस्त,देशातील नागरिकांना सुरक्षा देण्यात मात्र अपयशी
वैभव नाईक, जीजी उपरकर, सतीश सावंत, संदेश पारकर, सुशांत नाईक यांचा घणाघात
जम्मू -काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज कणकवली पटवर्धन चौकात तीव्र स्वरूपात निषेध केला. यावेळी पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून तो जाळण्यात आला. यावेळी मुडदाबाद, मुडदाबाद पाकिस्तान मुडदाबाद! एक-दो, एक-दो पाकिस्तान को फेकदो, केंद्र सरकार हाय हाय! अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर,जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. शिवसेना नेते आणि शिवसैनिकांनी हाताला काळ्या फिती बांधून हल्ल्याचा निषेध नोंदविला तसेच या अतिरेकी हल्यात मृत पावलेल्या नागरिकांसाठी दोन मिनिट स्तब्ध उभे राहत श्रद्धांजली वाहण्यात आली.





