कणकवली (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांनी ठेकेदारांची थकीत बिले मिळवून द्यावीत ! ; माजी आमदार परशुराम उपरकर यांची मागणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेकेदारांची २२५ कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. ही बिले पालकमंत्री नितेश राणे यांनी ठेकेदारांना मिळवून द्यावीत, तसे झाल्यास शिवसेना उबाठा पक्ष त्यांचा जाहीर सत्कार करेल. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी पदाचा गैरवापर करून स्वतःच्या जाॅब कार्डचा नंबर वापरून कणकवली विभागातील अनेक ठेकेदारांना कामे दिली होती. त्या ठेकेदारांनी कर्ज काढून कामे पूर्ण केली आहेत.
मात्र, अद्यापही ठेकेदारांची बिले मंजूर झालेली नाहीत. अभियंत्यांनी नियम डावलून कामे करून घेतली आहेत, त्यामुळे ज्या ठेकेदारांनी ही कामे केली आहेत, त्यांना कामांची बिले मिळण्याची शक्यता कमी आहे, असा गौप्यस्फोट शिवसेना उबाठाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. येथील संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. उपरकर बोलत होते.
उपरकर पुढे म्हणाले, सार्वजिनक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कणकवली विभागाचा कारभार स्वीकारल्यापासून आजपर्यंत नियमबाह्य कामे करण्याचा सपाटा लावला आहे. २०ः५९च्या कामासाठी शासनाकडून कमी निधी मिळतो, असे असतानाही देखील अभियंत्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या जाॅब कार्ड नंबरचा वापर करून कणकवली विभागातील अनेक नव्या ठेकेदारांना कामे दिली. त्यांनी कर्ज काढून ही कामे पूर्ण केली आहेत. मात्र, अद्यापही त्यांना कामाचे बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे त्या ठेकेदारांना नैराश्य आले आहे. या कामांची बिले ठेकेदारांना केव्हा मिळणार, याबाबत मी अधीक्षक अभियंत्या यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी ही बिले मिळणे कठीण असल्याचे त्यांनी मला सांगितले, असे उपरकर म्हणाले.
कार्यकारी अभियंता हे आपल्या पदाचा गैरवापर करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली विभागात काम करताना त्यांनी नियमबाह्य कामे केली आहेत. त्यामुळे त्यांच्या कारभाराची चौकशी करावी, याकारिता मी कोर्टात फौजदारी केस दाखल केली असून लोकायुक्त, सचिव, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंत्या यांच्याकडे त्यांचाविरोधात तक्रारदेखील केली आहे. कार्यकारी अंभियता ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहे.
मात्र, त्यांच्या कारभाराची खातेनिहाय चौकशी होत नाही, तोपर्यंत त्यांनी मंजूर केलेल्या कामांचे पैसे शासनाने मंजूर करू, अशी मागणी आपण संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकारी अभियंत्यांनी नियमबाह्य कामे ठेकेदारांना दिली. त्यामुळे त्यांची बिले मिळणे कठीण झाले असून अभियंत्यांच्या फेऱ्यात ठेकेदार अडकले आहेत. या ठेकेदारांना पालकमंत्री नितेश राणे यांनी न्याय मिळवून द्यावा आणि मंत्री तथा पालकमंत्री म्हणून आपण सक्षम आहोत हे सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान उपरकर यांनी दिले आहे.





