दारुम येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी | विधवा महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम

कणकवली : संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंतीचे औचित्य साधून तळेरे प्रभागाच्या वतीने दारूम येथे विविध क्षेत्रातील सेवावृत्ती कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, महिलांचा विशेष सत्कार सोहळा आणि विधवा महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला मंडळाचे कणकवली तालुका अध्यक्ष महानंदा चव्हाण, सचिव अविनाश चव्हाण, तालुका उपाध्यक्ष शंकर चव्हाण, खजिनदार संजय चव्हाण तसेच तळेरे प्रभागाचे अध्यक्ष तथा कासार्डे गावचे पोलीस पाटील महेंद्र देवरुखकर, उपाध्यक्ष अनिल चव्हाण, रामचंद्र पाटणकर, सचिव संतोष जाधव, खजिनदार विजय देवरुखकर, दिपक देवरुखकर, नारायण देवरुखकर, सत्यवान देवरुखकर, दारूम पोलीस पाटील संजय बिळसकर, विलास देवरुखकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचा समाज बांधवांच्या वतीने शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. याशिवाय सेवानिवृत्त कर्मचारी मारुती चव्हाण (एस.टी महामंडळ) दत्ताराम जाधव (खारलॅंन्ड विभाग) व विजय देवरुखकर (सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक) या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचाही समाज बांधवांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित ग्रा.प‌ं. सदस्य सौ.श्वेता चव्हाण (कासार्डे ग्रा.पं.), श्रीम. प्रभावती चव्हाण (दारुम ग्रा.पं.) यांचाही तळेरे प्रभागाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

समाजातील विधवा महिलांचा हळदी कुंकू समारंभ आयोजित करुन समाजांच्यावतीने अनिष्ट चालीरीती दुर करण्याचा प्रबोधनात्मक संदेश देण्यात आला.

दरम्यान या कार्यक्रमात महिलांसाठी खेळ पैठणीचा हा अतिशय बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देवेंद्र देवरुखकर व रुपेश बांदेकर यांनी केले. खेळ पैठणीचा खेळात नेहा नारायण देवरूखकर संजना संजय बिळस्कर या दोघी पैठणीच्या मानकरी ठरल्या. या कार्यक्रमा दरम्यान दारुम सरपंच तेजश्री लिंगायत, उपसरपंच प्रविण तळेकर तसेच शंकर चव्हाण, सचिन जाधव आदींनी आपले मनोगत व्यक्त करताना सत्कारमूर्तीचे तसेच प्रभागाच्या उपक्रमाचे विशेष कौतुक करून उपस्थितांना विशेष मार्गदर्शन केले. संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र देवरुखकर यांनी तर आभार संजय बिळसकर यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.