अम्बरग्रिस तस्करी प्रकरणात सांगली एलसीबी पथकाची कारवाई…!

मालवण : सांगली एलसीबीच्या पथकाने शनिवारी मालवण येथून निलेश रेवंडकर रा. तळाशील याला ताब्यात घेतले. तसेच मालवण पोलिसांनी निलेश याच्याकडून जप्त केलेले १८ किलो अम्बरग्रिसही सांगली पोलिसांनी आपल्या ताब्यात घेत पुढील तपासासाठी सांगली येथे रवाना झाले आहेत. सांगली येथे अम्बरग्रिसच्या (व्हेलची उलटी) तस्करी प्रकरणात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करून काही संशयितांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी कोकण किनारपट्टीवरील तळाशील मालवण कनेक्शन समोर आले आहे. आतापर्यंत या गुन्हे प्रकरणात तीन संशयितांना अटक करण्यात आली असून, सुमारे २४ कीलोचे अम्बरग्रिस जप्त करण्यात आले आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २४ कोटी किंमत असल्याचे बोलले जात आहे.

सांगली येथील एलसीबीच्या पथकाने बुधवारी (८ फेब्रुवारी) सांगली येथील शामराव नगर परिसरात सापळा रचून तस्करी साठी आणलेली ५ किलो ६०० किलोग्रॅम वजनाची व्हेलची उलटी जप्त केली होती. गुन्हा दाखल करत सलीम गुलाब पटेल (वय ४९, रा. खणभाग, सांगली) व अकबर याकूब शेख ५१, रा. पिंगळी कुडाळ, सिंधुदुर्ग) यांना अटक केली होती.

संशयितांकडे चौकशी केली असता तस्करी साठी आणण्यात आलेली व्हेलची उलटी मालवण तळाशिल येथील निलेश रेवंडकर यांच्या जवळील असल्याचे त्यांनी सांगितले होते.

दरम्यान गुरुवारी (९) रोजी रात्री पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलिस हेड कॉन्स्टेबल सुशांत पवार, एच व्ही पेडणेकर यांच्या पथकाने तळाशिल, मालवण येथून निलेश प्रकाश रेवंडकर यांच्या कडून वाळूत ठेवलेली १८.६०० किलो वजनाची व्हेलची उलटी जप्त केली होती. या कारवाई बाबतची माहिती मालवणं पोलिसांनी सांगली येथील एलसीबीच्या पथकाला दिली होती.

सांगली एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पीएसआय महादेव पोवार, पीएसआय विशाल येळेकर व त्यांचे पथक शनिवारी मालवण येथे दाखल झाले. त्यांनी निलेश रेवंडकर याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सापडून आलेली आणि मालवण पोलिसांच्या ताब्यात असलेली व्हेलची उलटी आपल्या ताब्यात घेतली. निलेश व अन्य संशयित आरोपींची ओळख कशी. निलेशकडे ही उलटी आली कुठून. यासर्व गोष्टींचा तपास होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या सर्व संशयितांवर वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये कारवाई करण्यात आली असून वन्य जीव तस्करी प्रकरणातील अन्य धागेदोरे याचा लवकरच उलगडा होईल. सर्व प्रकरणाचा अगदी सखोल तपास केला जाणार असल्याचे संदीप शिंदे यांनी सांगितले आहे. या प्रकरणात सांगली येथील वन विभागाच्या माध्यमातूनही तपास सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले.