आंब्यावर UID नाही, तर तो देवगड हापूस नाही ; देवगड मध्ये झालेल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या चर्चासत्रात आगामी आंबा हंगामात प्रत्येक आंब्याला UID देण्याचा निर्णय

42

 

देवगड (प्रतिनीधी)

आंब्यावर UID नाही, तर तो देवगड हापूस नाही ; देवगड मध्ये झालेल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या चर्चासत्रात आगामी आंबा हंगामात प्रत्येक आंब्याला UID देण्याचा निर्णय

 देवगड हापूस आंब्याच्या नावाने बोगस विक्रीला पायबंद घालण्यासाठी शेतकऱ्यांकडून होत असलेल्या मागणी च्या अनुषंगाने आता प्रत्येक देवगड हापूस आंब्याला युनिक कोडचा (UID) देण्याचा निर्णय देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने घेतला आहे. 2 जानेवारी 2025 रोजी संस्थेने आयोजित केलेल्या चर्चासत्रात सुमारे 110 बागायतदार व विक्रेते उपस्थित होते आणि सर्वांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे.
त्यामुळे हापूस जीआय ची रजिस्टर्ड प्रॉपरायटर अर्थात custodian असल्याने जीआय काय‌द्याने प्राप्त होणारे अधिकार वापरुन आता देवगड हापूस च्या नावाने विकल्या जाणाऱ्या प्रत्येक आंब्यावर युनिक कोड असणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याकरता असे युनिक कोड चे पेटंट मिळालेल्या मुंबई येथील सन सोल्यूशन या कंपनीबरोबर संस्थेने करार केला आहे, असे देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अॅड. अजित गोगटे यांनी सांगितले. यामुळे देवगड हापूसच्या नावाखाली होणाऱ्या बोगस आंबा विक्रीला पायबंद घालण्यात मोठा हातभार लागणार आहे.
असे मिळणार युनिक कोड
हे युनिक कोड संस्थेच्या मार्फत वितरित केले जाणार आहेत. अशा युनिक कोड चा बोगस वापर होऊ नये, त्याकरता शेतकऱ्यांना त्यांची देवगड तालुक्यातील आंबा कलमे त्यांच्या 7/12 उताऱ्यावर वर तपासून आणि त्यांची उत्पादन क्षमता बघून तितकेच कोड मिळणार आहेत. असे कोड मिळण्याकरता प्रत्येक शेतकरी जीआय धारक असायला हवा. आंब्यासाठी वापर होण्याचे हे पहिले वर्ष असल्याने या कोड चे स्टिकर छापून तयार होण्याकरता आणि त्यांची सिस्टिम मध्ये एंट्री होण्याकरता सुमारे 45 दिवस लागणार आहे. त्यामुळे 10 जानेवारी 2025 च्या आत शेतकऱ्यांनी संस्थेकडे संपर्क साधून नोंदणी करावी आणि कोड ची ऑर्डर नोंदवावी असे आवाहन अॅड. अजित गोगटे यांनी केले आहे.
युनिक कोड चा वापर कसा होणार?
सन सोल्यूशन या कंपनीला मिळालेले पेटंट हे नक्कल न होणाऱ्या आणि एकदाच वापर होणाऱ्या कोड साठी मिळाले आहे. यामध्ये प्रत्येक कोड हा दोन भागात केलेल्या स्टीकर च्या माध्यमात असतो. त्या कोडचा एक भाग स्टिकर च्या खाली असतो. तो भाग वाचण्याकरता स्टिकर काढल्यास त्याचे आपोआप दोन तुकडे होतात, ज्यामुळे स्टिकर पुनः वापरता येत नाही. शेतकऱ्यांनी प्रत्येक आंब्याला असे स्टिकर लावायचे आहे.
ग्राहकांना युनिक कोडचा वापर कसा करता येणार?
ग्राहकांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून साध्या सोप्या पद्धतीने आंब्याची तपासणी होणार आहे. यासाठी +919167668899 या सन सोल्यूशन च्या अँटी-काउंटरफीटिंग व्हॉट्सअॅपच्या नंबर वर ग्राहकांनी सदर स्टिकरचा फोटो पाठवल्यास ही यंत्रणा त्या स्टिकर वरील कोड वाचते, आणि स्टिकर च्या खालच्या बाजूला असलेल्या कोड चा भाग पाठवा असा मेसेज पाठवते. मग ग्राहकांनी तो कोड लिहून पाठवल्यानंतर सदर आंब्या च्या संदर्भातील मेसेज यंत्रणेकडून येतो. या मेसेज मध्ये शेतकऱ्यांना हवा तसा मेसेज पाठवता येईल, जसेकी शेतकऱ्यांचे नाव, गावाचे नाव, जीआय क्रमांक, इत्यादि मुद्दे पाठवता येतील, जेणेकरून ग्राहकांना सदर आंब्याबाबत ची इत्यंभूत माहिती मिळेल आणि आपण खात असलेला आंबा 100% खात्रीचाच देवगड हापूस आहे याची खात्री होईल.
देवगड हापूस साठी स्वतंत्र जीआयची मागणी
सध्या हापूस आंब्याला मिळालेले जीआय मानांकन हे ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या पाच जिल्ह्यांसाठी मिळालेले आहे. परंतु बाजारात देवगड हापूस ला बाजारात पसंती असल्यामुळे देवगड हापूस साठी स्वतंत्र जीआय मिळवा अशी मागणी देवगड च्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. वास्तविक 2018 मध्ये जेव्हा पहिल्यांदा जीआय जाहीर झाला त्यावेळी देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस असे दोन स्वतंत्र जीआय जाहीर झाले होते. परंतु 2008 साली हापूस साठी अर्ज केलेल्या कोकण कृषी विद्यापीठाचे श्री बी आर साळवी आणि कोकण हापुस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेचे श्री विवेक भिडे यांनी मात्र संपूर्ण कोकणातील हापूस आंबा एक सारखाच आहे, आणि म्हणून संपूर्ण कोकणातल्या आंब्याला हापूस म्हणून जीआय द्या असा आग्रह धरला. त्यामुळे जीआय प्राधिकरणाने देवगड आणि रत्नागिरी हापूसला जाहीर केलेले जीआय मानांकन परत घेऊन दोन्ही अर्ज 2008 सालच्या हापूस या जीआयच्या अर्जात एकत्रित केले होते.

 

 

त्यावेळी श्री भिडे आणि श्री साळवी यांनी प्रोसेसिंगचा आंबा मोठ्या प्रमाणात हापूस या नावाने प्रदेशात एक्स्पोर्ट होत आहे आणि त्याला आळा घालण्याच्या दृष्टीने कोकणाच्या हापूसला एकत्रित जीआय मिळाला हवा असा युक्तिवाद केला होता. परंतु जिआय मिळाल्यानंतर परदेशात एक्सपोर्ट राजरोसपणे चालू आहे आणि त्याला कोणताच आळा बसलेला नाही. त्यामुळे देवगडच्या शेतकऱ्यांना आपली फसगत झाल्याची भावना निर्माण होत आहे आणि त्यामुळे देवगड हापूसच्या स्वतंत्र जीआय साठी पुन्हा एकदा संस्थेने प्रयत्न करावे अशी मागणी देवगडच्या हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. देवगडच्या हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीला मान देऊन देवगड हापूसच्या स्वतंत्र जीआय साठी पुन्हा एकदा पावले उचलण्याचा आणि एकत्रित हापूस च्या जीआय मधून बाहेर पडण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचा निर्णय सदर चर्चासत्रात घेण्यात आला.
सदर चर्चासत्रामध्ये आंबा उत्पादक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. डी. बी. बलवान, संचालक श्री. सुधीर जोशी, श्री. वि‌द्याधर माळगांवकर तसेच सौ. रेश्मा जोशी उपस्थित होते. त्याचप्रमाणे शेतकरी वर्गातून श्री. महेश गोखले, श्री. राजा भुजबळ, श्री. पाटणकर, श्री. भूषण बोडस, श्री. राकेश मुणगेकर, श्री. खाजणवाडकर, श्री. मुकुंद बापट, श्री. नाना गोखले, श्री. नरेश डामरी, श्री. नारायण तिर्लोटकर, श्री. प्रदिप कदम, श्री. नितीन वारिक, श्री. हनुमंत कदम, श्री. उल्हास मणचेकर, श्री. केशव पाटणकर यांचेप्रमाणेच अनेक प्रमुख शेतकरी उपस्थित राहून चर्चेमध्ये सहभाग घेतला.