१४ विक्रेते, १६ किलो प्लास्टिक , ५ हजाराचा दंड ; देवगडमध्येही प्लॅस्टिक बंदीच्या अनुषंगाने झाली कारवाई

71
देवगड/ प्रतिनिधी

१४ विक्रेते, १६ किलो प्लास्टिक , ५ हजाराचा दंड ; देवगडमध्येही प्लॅस्टिक बंदीच्या अनुषंगाने झाली कारवाई

एकल वापर,प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दर महिन्याला अंमलबजावणी करण्यासाठी मोहीम राबिवण्याच्या सूचनेनुसार देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने मोहीम राबविण्यात आली या मोहिमे अंतर्गत कमी जाडीच्या प्लास्टिक पिशवी वस्तू वापरणाऱ्या 14 विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली त्यांच्याकडून 16 किलो प्लास्टिक जप्त करून सुमारे पाच हजार रुपये रकमेचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे मुख्यअधिकारी सुरज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.एकल वापर प्लास्टिकचा वापर करणाऱ्या रस्त्यावरील विक्रेते,फुल विक्रेते,स्थानिक बाजारपेठ व्यापारी,भाजीपाला विक्रेते आणि दुकानदार यांच्यावर नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाद्वारे कारवाई केली. ही मोहीम सलग दोन दिवस राबविण्यात आली.
या मोहिमेमध्ये गुरुप्रसाद कदम, कुंदन घाडी,रेश्मा मोरे,प्रदीप लाड, संदेश सावंत, उत्तम जाधव, किशोर जाधव,अमोल चव्हाण,स्वरूप कनेरकर,योगेंद्र कनेरकर आदी कर्मचारी उपस्थित होते.
पर्यावरण रक्षणासाठी व्यापा-यांनी सहकार्य करावे – सुरज कांबळे
देवगड जामसंडे शहरातील व्यापारी व नागरिकांनी कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्याचा वापर टाळावा व कागदी किंवा कापडी पिशवीचा वापर करून पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लावावा असे आवाहन मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी केले.