मुंबई : होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त २५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ०३ मार्च ते १२ मार्च २०२३ दरम्यान या गाड्या कोकणातील मार्गावरून धावणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.
अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली असून, महामंडळाने यंदा २५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.





