बांदा (मंगल कामत)१९ ऑगस्ट २०२४
देशभक्तीपर समुह गीतगायन स्पर्धेत आदिशक्ती व महालक्ष्मी ग्रुप प्रथम ; श्रीमती बनुताई पै ग्रंथालयाचे आयोजन
भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित देशभक्तीपर समुहगीत गायन स्पर्धेत मोठ्या गटात आदिशक्ती ग्रुप प्रथम, माऊली समुह द्वितीय तर शिवनेरी संघाने तृतीय क्रमांक मिळविला. तर लहान गटातून महालक्ष्मी समुह प्रथम, सिंधुदुर्ग गट द्वितीय तर सिंहगट समुहाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्या संघांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
मडुरा येथील श्रीमती बनुताई पै ग्रंथालय व संस्कार केंद्र यांच्यामार्फत आयोजित देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल मडुरा प्रशालेच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये संपन्न झाली. यावेळी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष कृष्णा करमळकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सायली परब, परीक्षक बाळकृष्ण मडुरकर, माजी उपसरपंच विजय वालावलकर, नागेश सावंत, सौ. सुवर्णा मडुरकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल सौ. मृणाल पंडित यांनी केले. ग्रंथालयाची यशस्वी वाटचाल व उपक्रम त्याचबरोबर ग्रंथालयाची सद्यस्थिती याचे अवलोकन त्यांनी केले. मुख्याध्यापिका सौ. सायली परब यांनी प्रशालेतील सर्व विद्यार्थी हे सभासद होण्यासाठी प्रयत्न करून ग्रंथालयाला शक्य ती मदत केली जाईल असे आश्वासन देऊन पुस्तकांच्या वाचनाची आवश्यकता विषद केली. कृष्णा करमळकर यांनी श्रीमती बनुताई पै ग्रंथालयाची स्थापना व कार्य त्याचबरोबर श्रीमती बनुताई पै यांचे जीवनाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे वाचन करावे असे आवाहन केले.
स्पर्धांचे परीक्षण बाळकृष्ण मडुरकर व विजय वालावलकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिद्धी मडुरकर हिने केले. आभार ग्रंथालयाच्या लिपिक सौ. स्नेहल सामंत यांनी मानले. श्रीमती बनुताई पै ग्रंथालय व संस्कार केंद्र मडुराच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.





